नाफेडची खरेदी : तुरीला ५ हजार ५० रुपयांचा भाव लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : अखेर चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नाफेडने गुरुवारपासून तूर खरेदी सुरू केली. ज्या शेतकऱ्यांकडे सातबारा व पेरेपत्रक नव्हते, त्यांना तूर खरेदीमध्ये ताटकळत राहावे लागले. सातबारा व पेरेपत्रक उपलब्ध केल्यावरच त्यांच्याकडून तूर खरेदी करण्यात आली. ‘लोकमत’ने १७ मे रोजीच्या अंकात ‘चंद्रपुरात तूर खरेदी बंदच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दिवसभरात तातडीने हालचाली होऊन नाफेडने दुसऱ्या दिवशी गुरुवारपासून तूर खरेदी केली आहे. नाफेडकरिता चांदा खंड शेतकी उत्पादक खेरदी-विक्री सहकारी संस्थेचे ही खेरदी सुरू केली आहे. पहिल्या दिवशी पाच शेतकऱ्यांकडून ५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून एफएक्यू या दर्जाची तूर खरेदी करीत आहे. चंद्रपूर बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार तूर विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडने तूर खरेदी सुरू केली आहे. चंद्रपूर व वरोरा या दोन्ही खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी शेतकऱ्याला सातबारा व पेरेपत्रक सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सातबाऱ्याअभावी शेतकऱ्यांना चंद्रपूर बाजार समितीत फटका बसला. त्यांना सातबारा व पेरेपत्रकांची मागणी करण्यात आली. शेतकऱ्याच्या पेरेपत्रातही तूर पेरल्याची नोंद पाहण्यात येत आहे. नाफेड ५ हजार ५० रुपये आधारभूत भाव देत आहे. तो व्यापाऱ्यांपेक्षा अधिक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मेपर्यंत तूर खरेदीचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये व्यापाऱ्यांची तूर खरेदी करण्यात येऊ नये, यासाठी सातबारा व पेरेपत्रक आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी चंद्रपूरमध्ये भारतीय अन्न-धान्य महामंडळाने १० हजार १०७ क्विंटल तूर खरेदी केली आहे. त्यानंतर २२ एप्रिलपासून ही खरेदी बंद होती. चंद्रपूर बाजार समितीत तूर खरेदी सुरू झाली नसल्याने मंगळवारी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना पत्र लिहून तूर खरेदीची मागणी करण्यात आली होती.
सातबाराअभावी खरेदी ताटकळत
By admin | Updated: May 19, 2017 01:09 IST