उद्योग परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST2021-05-05T04:47:02+5:302021-05-05T04:47:02+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यातील उद्योगांना त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्याची संधी आहे. सी.एस.आर. निधी कोविड संदर्भातील उपाययोजनांसाठी ...

उद्योग परिसरात आरोग्य सुविधा उपलब्ध करा
चंद्रपूर : जिल्ह्यातील उद्योगांना त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्याची संधी आहे. सी.एस.आर. निधी कोविड संदर्भातील उपाययोजनांसाठी खर्च करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्यांचे स्वतःचे रुग्णालय आहे. त्या उदयोगांनी सी.एस.आर. निधीच्या माध्यमातून बेडस्, ऑक्सिजन बेडस्, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी आरोग्य सुविधा उपलब्ध करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्ह्यातील उद्योगांच्या प्रमुखांशी त्यांनी मंगळवारी ऑनलाईन बैठकीद्वारे संवाद साधला. त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांबाबत चर्चा केली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माणिकगड सिमेंट, अल्ट्राटेक, गोपानी आर्यन, धारिवाल, लायड मेटल्स्, दालमिया सिमेंट, अंबुजा सिमेंट आदी उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांनी त्यांच्या परिसरातील शासकीय रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध कराव्या, उद्योगातील कामगारांना, त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरणाचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर मशीन उपलब्ध कराव्या, अशा सूचना केल्या. रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी यादृष्टीने उद्योगांनी त्यांच्या रुग्णालयामध्ये कोविड केअर सेंटर तयार करावे, प्रारंभिक उपचारासाठी औषध गोळ्यांची किट तयार करून ती कामगारांमध्ये वितरीत करावी, परिसरातील नागरिकांना मास्कचे वितरण करावे, स्थानिक महिला बचतगटांकडून मास्क तयार करून घेतल्यास त्यांनाही उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होईल, अशी सूचना त्यांनी केल्या.
यावेळी विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी त्यांनी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आ. मुनगंटीवार यांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने निश्चितपणे आवश्यक उपाययोजना व कार्यवाही करण्यात येईल, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी आश्वासन दिले.
बाॅक्स
जिवतीला रुग्णवाहिका
जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाला त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, असे माणिकगड सिमेंट कंपनीचे कांबरा यांनी यावेळी सांगितले.