जिवती येथे कोविड केअर सेंटर व ३० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:11+5:302021-05-05T04:46:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिवती हा आदिवासी बहुल ग्रामीण भाग आहे. जिवती नगर पंचायत क्षेत्र व तालुक्याच्या ग्रामीण ...

जिवती येथे कोविड केअर सेंटर व ३० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिवती हा आदिवासी बहुल ग्रामीण भाग आहे. जिवती नगर पंचायत क्षेत्र व तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील रूग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी १०० बेड्सचे कोविड केअर सेंटर जिवती येथे तयार करण्यात यावे सोबतच ३० ऑक्सिजन बेड्ससुध्दा उपलब्ध करण्यात यावेत, अशा सूचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागणीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेत चर्चा केली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समिती उपसभापती महेश देवगते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कोविड केअर सेंटरमध्ये उत्तम प्रतीचे जेवण पुरविण्याबाबत नगर पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले. या परिसरातील उद्योगांच्या सी. एस. आर. निधीतून रूग्णांसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्यात अथवा भाड्याची वाहने उपलब्ध करावी, अशा सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या.
पदभरतीबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सेवानिव़त्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीने कामावर घेण्यात यावे व सफाई कामगारांना दुप्पट पगार देऊन कामावर घेण्याबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी सूचित केले.