गावागावात शुद्धपाणी पुरविणार
By Admin | Updated: May 25, 2017 00:25 IST2017-05-25T00:25:28+5:302017-05-25T00:25:28+5:30
उत्तम आरोग्याचे रहस्य हे शुद्ध पाणी पुरवठ्यामध्ये आहे. यापूर्वी जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शुद्ध पाण्याचे एटीएम सुरू केल्यामुळे...

गावागावात शुद्धपाणी पुरविणार
सुधीर मुनगंटीवार : मारोडा येथे ४६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उत्तम आरोग्याचे रहस्य हे शुद्ध पाणी पुरवठ्यामध्ये आहे. यापूर्वी जिल्ह्यातील दोन गावांमध्ये शुद्ध पाण्याचे एटीएम सुरू केल्यामुळे या ठिकाणच्या जनतेच्या आरोग्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात व पुढे जिल्ह्यामध्ये सर्वांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, यासाठी पाणी पुरवठा योजनांचे जिल्ह्यात जाळे उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
मूल तालुक्यातील मारोडा येथील २४ गावांच्या ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत आज बुधवारी मूल तालुक्यातील २४ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतील पहिली योजना मूल तालुक्यात सुरू होत आहे, हे येथे उल्लेखनीय. ४६ कोटी रूपयांच्या या योजनेच्या भूमिपूजनाला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते.
वैनगंगा नदीतून या योजनेसाठी पाणी पुरवठा केला जाणार असून यामधून फिस्कुटी, चरूर तुकूम, राजगड, भवराळा, चिचोली, ताडाळा, हळदी, गावगन्ना, कोसंबी, चिंचाळा, काटवन, कारवन, मारोडा, चक चिकली, मोरवाही, गांगलवाडी, मरेगाव, आकापूर, चिमडा, टेकाडी, जानाळा, आगडी, कांतापेठ, टोलेवाही व मंदा तुकूम या गावांचा समावेश आहे.
५ आॅक्टोबर २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या योजनेला विक्रमी १८ महिन्यात पुर्ण करण्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा संकल्प असून ५५ लिटर प्रतिमुनष्य प्रति दिवस पाणी पुरवठा या योजनेतून होणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत या परीसरातील पाच गावकऱ्यांनी या योजनेचे भूमिपूजन केले. उभय मंत्र्यांनी प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले.
यावेळी व्यासपीठावर जि.प. चे अध्यक्ष देवराव भोगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, सभापती पूजा डोहणे, माजी जि.प. अध्यक्षा संध्य गुरुनुले उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी २४ गावातील नागरिक व प्रत्येक गावाचे सरपंच मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य या विषयाला केंद्रित ठेऊन राज्यातील सरकार काम करत आहे. केवळ सत्तेसाठीच कामे करायचे नसते तर सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करून जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याचा आमचा मार्ग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात सुरू करण्यात आलेल्या विकास कामाचा आढावा मांडला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे कामे प्रगती पथावर आणण्यात येणार असून संपूर्ण मतदार संघातील गावांचा पाणी आराखडा तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ज्या ठिकाणी इमारती नसेल त्या ग्रामपंचायतीसाठी इमारती उभारणे, मूल येथे राईस क्लस्टर निर्मिती करणे, चंद्रपूर ते गडचिरोली रस्त्याला महामार्गाची मान्यता मिळवून विकास घडवणे, पंजाब नॅशनल बॅकेच्या माध्यमातून भरतपूर जवळ कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणे, अशी कामे दृष्टीपथात येत आहेत. चंद्रपूरचे मेडीकल कॉलेज, बांबू प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
जंगला शेजारी राहणाऱ्या गावातील सर्व समाजाच्या महिलांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस वितरित करण्यात येणार आहे. तर वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी तारेच्या कुंपन योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुनगंटीवारांमुळे योजनांना चालना- लोणीकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सारख्या ग्रामीण जनतेची व जनजीवनाची जाणीव असणाऱ्या नेतृत्वामुळेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पाणी पुरवठा व स्वच्छता विषयाला प्राधान्य मिळाले. महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेला शद्ध पाणी पुरवठा करणे आणि संपूर्ण महाराष्ट्र हागणदारी मुक्त करणे यामध्ये या विभागाने लक्षणीय काम केल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले. ना. मुनगंटीवार यांनी गावातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्यासाठी अडीच हजार कोटीची तरतूद केली. दोन वर्षात गावागावातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील १७ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. मुनगंटीवारांचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना पूरक ठरला आहे. ४५ हजार कोटी रूपयांची तरतूद त्यांनी शेतकऱ्यांसाठी केली असून त्यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासासाठी काम करायची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी यावेळी जाहीर आनंद व्यक्त केला.