विविध ठिकाणी मोर्चा काढून निषेध
By Admin | Updated: January 23, 2016 01:10 IST2016-01-23T01:09:12+5:302016-01-23T01:10:04+5:30
१८ जानेवारीला तेलंगाणा येथील हैद्राबाद विद्यापीठात पीएचडीसाठी शिक्षण घेत असलेल्या रोहित वेमू या विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.

विविध ठिकाणी मोर्चा काढून निषेध
दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : चंद्रपूर, कोठारीत मोर्चा, राजुऱ्यात कॅण्डल मार्च
चंद्रपूर : १८ जानेवारीला तेलंगाणा येथील हैद्राबाद विद्यापीठात पीएचडीसाठी शिक्षण घेत असलेल्या रोहित वेमू या विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. या घटनेमुळे दलित समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र मोर्चे, आंदोलन करून शासनाच्या मुस्कटदाबीचा कडकडीत निषेध सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज शुक्रवारी चंद्रपूर व कोठारीत मोर्चा तर गडचांदुरात कॅण्डल मार्च काढून निषेध नोंदविण्यात आला.
दलित विद्यार्थ्यांस विद्यापिठात दिली जाणारी वागणूक अमानवीय असल्याने त्याविरुद्धात आवाज उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना निलंबित करून त्यांना वसतीगृहातून हाकलून देण्यात आले. हे सहन होऊ न शकल्याने रोहित वेमू या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याच्या अंतिम संस्काराची माहितीही त्याच्या कुटुंबियांनाही देण्यात आली नाही. परिणामी या घटनेचा सर्वत्र निषेध सुरू आहे. त्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही उमटत आहेत. चंद्रपुरात दुपारी १ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कोठारीतही मोर्चाचे आयोजन करून बल्लारपूरचे नायब तहसिलदार विकास अहीर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात रोहित वेमू दलित असल्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनातील समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, मानव संसाधन मंत्री स्मृती ईराणी यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, दलित विद्यार्थ्यांना संरक्षण पुरविण्यात यावे, दोन्ही केंद्रीय मंत्र्यांच्या फोन संभाषणाची सखोल चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात राजकुमार परेकर, शुभम खोब्रागडे, धिरज बांबोडे, शैलेश रामटेके, प्रमोद खोब्रागडे, वेणुदास खोब्रागडे, संदीप यावलीकर, विनोद बुटले, अमोल कातकर यांच्यासह शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.यासोबतच माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या वतीने राजुऱ्यात कॅण्डल मार्च काढून रोहित वेमूला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कॅण्डल मार्चमध्ये यावेळी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय सचिव हरिक्रिष्णा पूजाला, शिवा राव, अरुण धोटे, विनोद दत्तात्रय, आशिष देरकर, आदी सहभागी झाले होते.