दोन एकरात वांग्याचे तीन लाखांचे उत्पादन
By Admin | Updated: November 24, 2014 22:54 IST2014-11-24T22:54:38+5:302014-11-24T22:54:38+5:30
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत पिकांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. कापूस, सोयाबीन पिकाला पर्याय म्हणून पालगाव येथील शेतकरी बाळकृष्ण गणपत आंबटकर

दोन एकरात वांग्याचे तीन लाखांचे उत्पादन
उत्पादनात भरारी : पालगाव येथील शेतकऱ्यांने फुलवली आधुनिक शेती
लखमापूर : यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत पिकांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. कापूस, सोयाबीन पिकाला पर्याय म्हणून पालगाव येथील शेतकरी बाळकृष्ण गणपत आंबटकर (५०) यांनी स्वत:च्या मालकीच्या दोन एकर शेतीत ठिंबक सिंचन व मल्वींग पद्धतीचा वापर केला आहे. याआधारे जमिनीत वांग्याचे पीक लावले असून यात आतापर्यंत त्यांनी तीन लाखांचा निव्वळ नफा कमविला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून वडीलोपार्जीत परंपरागत शेती पद्धतीने उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्याने गेल्या पाच वर्षापासून टरबूज, कांदा, काकडी यासारख्या फळ पिकाचे उत्पादन याआधी घेतले आहे. यावर्षी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार व तालुक्यातील शेतकरी मंडळाची मदत घेत त्यांनी वांग्याची शेती केली आहे. यामध्ये साधारणत: दीड लाखापर्यंत लागवड खर्च आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नांदाफाटा, आवारपूर, बिबी या औद्योगिक वस्तीमुळे मालाची वाहतूक सोपी जात आहे. तर चंद्रपूर येथील भाजीपाला बाजारात वांग्याची विक्री शेतकरी करीत आहे. सर्वे-६२ मौजा पालगाव येथील शेतीच्या सिंचनासाठी अर्ध्या किलोमीटवरुन पाईपद्वारे पाणी आणून ठिंबक सिंचन करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ अर्ध्या तासात पाणीपुरवठा करणे सोपे जात आहे. शेतकऱ्याला सुरुवातीला ७५० रुपयाचे बियाणे १२०० रुपयाचे मजूर, ६० ते ७० हजार रुपयाची किटकनाशक फवारणी, ३० हजार रुपयांपर्यंत काढणी खर्च तर १५ हजार रुपये चार दिवसाआड वाग्यांची तोडणी करीता लागत आहे. मात्र, दिवसेंदिवस मिळणाऱ्या नफ्यामध्ये वाढ होत असल्याने वांग्याबरोबरच टोमॅटोची शेतीही आधुनिक पद्धतीने त्यांनी केली आहे. (वार्ताहर)