श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती
By Admin | Updated: May 27, 2017 00:37 IST2017-05-27T00:37:07+5:302017-05-27T00:37:07+5:30
पाणी फाऊंडेशनपासून प्रेरणा घेऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती
बीडीओचा पुढाकार : पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : पाणी फाऊंडेशनपासून प्रेरणा घेऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी श्रमदानातून १३० खड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ४ कोटी वृक्ष लागवड प्रकल्पामध्ये हा एक प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता कोरपना पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर यांनी पुढाकार घेतला आहे.
येत्या काही दिवसांवर पावसाळा आला आहे. त्यावेळी पंचायत समितीकडून वृक्षलागवडीवर भर दिला जाणार आहे. त्याच धर्तीवर आगामी वृक्षलागवडीसाठी पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक तसेच आपले सरकार सेवा केंद्रचालक आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्रमदानातून १३० खड्डे तयार केले आहेत. महिला कर्मचाऱ्यांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या भागात जमीनीखाली खडकाचे प्रमाण जास्त असल्याने खड्डे खोदणे कठीण होते. मात्र सर्वांच्या इच्छाशक्तीने काम पार पाडले.
येत्या पावसाळ््यात सर्व कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून कडू लिंब, करंज आदींची दजेदार व मोठी रोपे लावण्याचा मानस आहे. कोरपना हा औद्योगिक तालुका असून तालुक्यात तीन सिमेंट कारखाने आहेत. अंबुजा, अल्ट्राटेक व माणिकगड या सिमेंट कंपन्याकडून ‘ट्री गार्ड’ची मदत मिळाल्यास झाडांचे रक्षण होण्यास मदत होईल. त्यासाठी आम्ही कंपन्यांना विनंती पत्र पाठविणार आहोत.
- डॉ. संदीप घोन्सिकर,
गटविकास अधिकारी, कोरपना
संविअ डॉ. संदीप घोन्सिकर यांनी राबविलेली योजना स्तुत्य आहे. तालुक्यातील प्रत्येक अधिकाऱ्याने अशा प्रकारे कार्य केल्यास जनतेचा सहभागसुद्धा वाढेल आणि वृक्ष लागवडीस चालना मिळेल.
- शाम रणदिवे,
सभापती, पंचायत समिती कोरपना