बालदिनाच्या कार्यक्रमाच्या बक्षिसांचे अद्यापही वाटप नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:33+5:302021-01-13T05:11:33+5:30
बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन शिक्षण व प्रशिक्षण परिषद, पुणेतर्फे विविध स्पर्धांचे ऑनलाइन आयोजन करण्यात ...

बालदिनाच्या कार्यक्रमाच्या बक्षिसांचे अद्यापही वाटप नाही
बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन शिक्षण व प्रशिक्षण परिषद, पुणेतर्फे विविध स्पर्धांचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची ऑनलाइन लिंक गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना पाठविण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. लॅाकडाऊन काळात विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार होते. यामध्ये भाषण, वक्तृत्व स्पर्धा, कविता, नाट्यछटा, पत्रलेखन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कोरोनामुळे सुट्ट्याच असल्याने अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. मात्र वरिष्ठ पातळीवर यांचे नियोजन करण्यात आले नाही. जि. प. शिक्षण विभागाने आपला अहवाल पाठविला आहे. मात्र राज्यपातळीवरील निकाल अद्यापही लागला नाही. दोन महिन्यांचा कालावधी होऊनही बक्षिसांचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांची प्रतीक्षा लागून आहे.
कोट
तालुका व जिल्हा स्तरावरील अहवाल पाठविला आहे. या स्पर्धेचा निकाल पुणे येथील एससीईआरटीमार्फत प्रसिद्ध करण्यात येतो. मात्र अद्यापही तो प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी
बॉक्स
निकालासाठी उशीर
या स्पर्धेत तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरून विद्यार्थी निवडण्यात येणार होते. या स्पर्धेचे नियोजन माध्यमिक विभागाकडे सोपविण्यात आले.
राज्य शैक्षणिक संशोधन शिक्षण व प्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धेचे माध्यमिक शिक्षण विभागाला पासवर्ड, आयडी व विविध विषयांची माहिती सविस्तरपणे मिळाली नाही.
बॉक्स
अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग
यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली. लाॅकडाऊन असल्याने शेकडो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.