भद्रावतीच्या रिबेका महाविद्यालयावर छापा

By Admin | Updated: May 16, 2015 01:36 IST2015-05-16T01:36:58+5:302015-05-16T01:36:58+5:30

शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केलेल्या भद्रावतीच्या रिबेका कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका रिबेका लभाने यांनी ...

Print on Bhadrawati's Rebecca College | भद्रावतीच्या रिबेका महाविद्यालयावर छापा

भद्रावतीच्या रिबेका महाविद्यालयावर छापा

चंद्रपूर : शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केलेल्या भद्रावतीच्या रिबेका कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका रिबेका लभाने यांनी अनेक बोगस महाविद्याल उघडून शासनाची कोट्यवधींची शिष्यवृत्ती लाटल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान रिबेकाच्या भद्रावती येथील कार्यालयावर गडचिरोली पोलिसांनी गुरूवारी छापा मारून महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली. दरम्यान, काही नर्सिंग कॉलेजचीही चौकशी सुरू केली आहे.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित शिष्यवृत्ती गैरव्यवहाराचा तपास गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील करीत असताना त्यांना चामोर्शी येथील महाविद्यालयाचे संस्थाचालक सूरज बोम्मावार यांनी चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून विद्यार्थी आणल्याची माहिती दिली. याच माहितीच्या अधारावर पाटील यांनी तपास कार्याला गती दिल्यावर भद्रावती येथील रिबेका कॉलेजच्या संचालिका रिबेका लभाने यांनी बोम्मावार यांना मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा पुरवठा केल्याची माहिती उघडकीस आली. त्याच आधारावर रिबेका लभने यांना अटक करून चौकशी केल्यावर भद्रावती व परिसरातील शेकडो लोकांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र बोम्मावार यांना उपलब्ध करून दिले. यानंतर रिबेका व बोम्मावार या दोघांनी एकाच विद्यार्थ्यांच्या नावावर दरवर्षी शिष्यवृत्तीची उचल केली.
दरम्यान, गुरूवारी गडचिरोली पोलिसांनी भद्रावतीत रिबेकाच्या कार्यालयावर छापे मारले. या कारवाईत शिष्यवृत्ती गैरव्यवहारासंबंधीची अनेक कागदपत्रे व माहिती मिळाली आहे. केवळ रिबेकाच नाही, तर भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर या शहरातील बहुसंख्य कॉलेजने याच पद्धतीने बोम्मावार यांना विद्यार्थ्यांचा पुरवठा केल्याची माहिती आहे.
एकच विद्यार्थी एकाच वर्षी दोन्ही महाविद्यालयात शिकत असल्याचीही अनेक कागदपत्रे यात पोलिसांना सापडली. आता गडचिरोली पोलिसांनी रिबेकाने दिलेल्या माहितीवरून चंद्रपूर जिल्ह्यातील इतरही महाविद्यालयांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, रिबेकाचेच भद्रावती व वरोरा परिसरात अनेक महाविद्यालये आहेत. तसेच चंद्रपुरातील काही नर्सिंग कॉलेजच्या गैरव्यवहाराचीही चौकशी सुरू केली आहे. येथील नर्सिंग कॉलेजने सुद्धा शिष्यवृत्तीची उचल करून शासनाची कोट्यवधी रूपयांनी फसवणूक केली आहे. अधिक तपास आता पोलीस करणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Print on Bhadrawati's Rebecca College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.