प्रधान सचिवांची मांडवगोटा येथे भेट
By Admin | Updated: April 2, 2015 01:29 IST2015-04-02T01:29:29+5:302015-04-02T01:29:29+5:30
महापाषाण युगीन काळातील पुरातन पार्श्वभूमी असलेल्या मांडवगोटा या नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाला राज्याचे प्रधान सचिव प्रविण परदेसी यांनी भेट दिली.

प्रधान सचिवांची मांडवगोटा येथे भेट
शंकरपूर : महापाषाण युगीन काळातील पुरातन पार्श्वभूमी असलेल्या मांडवगोटा या नावाने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणाला राज्याचे प्रधान सचिव प्रविण परदेसी यांनी भेट दिली. या भेटीत उत्कृष्ट पर्यटन स्थळ करण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शंकरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरापूर येथे हा मांडवगोटा अस्तित्वात आहे. हे स्थळ शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळाने प्रकाशझोतात आणले आहे. मंडळाच्या सहकार्याने डेक्कन पुरातन व संशोधन विद्यापीठ पुणे येथील डॉ. कांती पवार यांनी सलग सन २०१० पासून ते सन २०१३ पर्यंत तीन वर्ष उत्खनन केले. या उत्खननात तांब्याची नाणी, बांगड्या, लोह अवजारे, सातवाहन कालीन विटा, मडके, मातीचे खापरे आदी साहित्य मिळाले. या सर्व निष्कर्षावरून हे बावीसशे वर्ष पुरातन असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा मांडवगोटा भारतातील सर्वात मोठी शवगृह असल्याचे पुरातन विभागाचे डॉ. कांती पवार यांनी सांगितले आहे.
हा मांडवगोटा चार मुरमाळी दगडावर उभा असून हा दगड जमिनीपासून वर सहा फुट, जमिनीखाली सहा फुट सलग एक दगड आहे. त्याच्यावर १० बाय १२ बाय २ फुटाचा वालुकाई दगड ठेवलेला आहे. या मांडवगोट्याचे दोन भाग केले असून दोन्ही भागात दरवाजे आहेत. यासारखेच पण आकाराने लहान तीन शवगृह या मांडवगोट्याच्या मागे आहेत. पण ते भग्नाअवस्थेत आहेत. सभोवताल मुरमाळी दगडाची संरक्षण भिंत उत्खननात आढळून आली आहे.
या मांडवगोट्याला पर्यंटनस्थळाचा दर्जा मिळण्यासाठी तरुण पर्यावरणवादी मंडळ कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा मांडवगोटा वनविभागाच्या जमिनीवर असल्याने वनविभागाच्या सहकार्याने पर्यटनस्थळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे व ब्रह्मपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी या स्थळाचे महत्व ओळखून तार जाळीची संरक्षण भिंत तयार करून दिली आहे. तिथे बगिचा निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. प्रधान सचिव प्रविण परदेसी यांना या स्थळाची माहिती देऊन त्यांना या स्थळापर्यंत आणले. त्यांनी या मांडवगोट्याची पाहणी केली. हा ऐतिहासिक ठेवा असल्याने व सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.