कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आले प्राथमिक शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST2021-05-05T04:47:05+5:302021-05-05T04:47:05+5:30
चंद्रपूर : कोरोना काळामध्ये शाळा बंद आहे. त्यामुळे शिक्षकांना काम नाही. फुकटचा पगार घेत असल्याची टीका सातत्याने शिक्षकांवर केली ...

कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आले प्राथमिक शिक्षक
चंद्रपूर : कोरोना काळामध्ये शाळा बंद आहे. त्यामुळे शिक्षकांना काम नाही. फुकटचा पगार घेत असल्याची टीका सातत्याने शिक्षकांवर केली जात आहे. दरम्यान, याच शिक्षकांनी सामाजिक भान राखत कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध २२ संघटना एकत्र आल्या असून त्यांनी आता कोविड केअर सेंटर तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णांलयात ऑक्सिजन सिलिंडर तसेच ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले आहे. यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींनी सीईओंची भेट घेत त्यांच्यापुढे प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या या कार्याचे सीईओंनी कौतुक केले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत रुग्णालयातील सुविधा कमी पडत आहे. त्यामुळे आता प्राथमिक शिक्षक कोविड सहायता निधीच्या माध्यमातून निधी गोळा करणार आहे. यानुसार ते आपल्या वेतनातील एक दिवसाचा पगार देणार आहे. यातून किमान १ कोटी रुपये गोळा होणार आहे. विशेष म्हणजे, कोरोना लाटेचा अंदाज घेऊन गरज भासल्यास पुढील काही महिन्यांतील एक दिवसाचे वेतनही देण्यासाठी त्यांनी ठरविले आहे. यासंदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांची शिष्टमंडळाने भेट घेत चर्चा केली. यावेळी स्वतंत्र कोविड सेंटरसह ऑक्सिजन सिलिंडर तसेच ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर पुरवठा या विषयावर चर्चा करण्यात आली. यासाठी त्वरित नियोजन करण्याचेही ठरविण्यात आले. गोळा झालेल्या निधीला प्राथमिक शिक्षक कोविड सहायता निधी असे नाव देण्यात आले आहे. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या तसेच चौथ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी म्हणून कोविड सेंटर उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सध्या निधीतून ऑक्सिजन सिलिंडर तसेच ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर खरेदी करून तालुका व जिल्हा स्तरावर वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षकांसाठी सुविधा राखीव ठेवण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षक कोविड सहायता समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी संघटना सहभागी झाल्या आहेत.
बाॅक्स
जनजागृतीसाठी शिक्षकांनी पुढे यावे
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये नागरिकांमध्ये अधिकाधिक जनजागृतीची गरज आहे. यासाठी ज्या शिक्षकांना आरोग्याबाबत ज्ञान आहे. त्या शिक्षकांना जनजागृतीसाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी सीईओंनी केले.
बाॅक्स
सीईओंनी केले कौतुक
जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध २२ संघटनांनी प्रथमच एकत्र येत कोरोनाला हरविण्यासाठी तसेच रुग्णांच्या मदतीसाठी निधी गोळा करीत आहे. या शिक्षकांच्या सामाजिक जबाबदारीचे सीईओ राहुल कर्डिले यांनी कौतुक केले असून या निधीतून रुग्णांना अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.