वासेऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ऑक्सिजनवर !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 03:14 PM2024-04-27T15:14:40+5:302024-04-27T15:21:08+5:30

Chandrapur : कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आणि औषधींचा तुटवडा असल्याने रुग्णांची गैरसोय

Primary health center in Wasera is in worst condition | वासेऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ऑक्सिजनवर !

Primary health center in Wasera

लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा:
ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या पूरक सुविधा मिळाव्यात, म्हणून शासनाने तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. सिंदेवाही तालुक्यात चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली असून, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आणि औषधींचा तुटवडा असल्याने वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडल्याचे दिसत आहे.

वासेरा हे चार हजार लोकसंख्या असलेले गाव आहे आणि आजूबाजूला २० ते २२ गावांचा परिसर आहे. परिसरात मध्यवर्ती ठिकाण असल्याने मागील २३ वर्षांपूर्वी वासेरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. या आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र येत असून, त्याअंतर्गत परिसरातील एकूण २२ गावातील नागरिकांना आरोग्याची सेवा दिली जाते. या आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर्ससह ४ परिचारिका, २ पर्यवेक्षिका, ४ आरोग्य सहायक, ३ शिपाई, २ चौकीदार, १ औषधी वितरक, १ तांत्रिक सहायक, १ लिपिक, अशा अनेक कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती केली आहे. 

मात्र, मागील अनेक दिवसांपासून या आरोग्य केंद्रात केवळ २ डॉक्टर, १ पर्यवेक्षिका, १ परिचारिका, २ आरोग्य सहायक, २ शिपाई कार्यरत असून, अन्य सर्व पदे रिक्त आहेत. राज्यात आपल्या जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक असून, ४३ अंशांवर पारा गेला असल्याने अनेकांना उष्माघाताचा प्रादुर्भाव होत आहे. दुष्काळाच्या काळात शेतकरी, शेतमजूर आणि गोरगरिबांना उपचारासाठी याच आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागतो. परंतु, वासेरा येथे अस्तित्त्वात असलेल्या आरोग्य केंद्राची अवस्था खूप वाईट झाली आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, औषधींचा तुटवडा, यामुळे येथील रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे

रुग्णालय, निवासस्थानावर लाखोंचा खर्च
या भागातील नागरिकांना आरोग्याची उत्तम सेवा मिळावी, याकरिता शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून वासेरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. डॉक्टर, परिचारिका यांना मुख्यालयी राहण्यासाठी उत्तम निवासस्थाने तयार करण्यात आली आहेत. मात्र, आज आरोग्य केंद्राची परिस्थिती पाहता रुग्णांना सेवा मिळण्याऐवजी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून जनतेच्या सेवेकरिता तयार केलेले प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी असून आता शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून या आरोग्य केंद्रावर उपचार करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.
 

Web Title: Primary health center in Wasera is in worst condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.