हंगामपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ
By Admin | Updated: May 25, 2017 00:27 IST2017-05-25T00:27:28+5:302017-05-25T00:27:28+5:30
मान्सूनचे आगमन ५ जूनपर्यंत महाराष्ट्रात होणार आहे, अशी खुशखबर हवामान खात्याने दिली आहे.

हंगामपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ
पैशाची जुळवाजुळव : तप्त उन्हात शेतकरी पुन्हा शेतात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मान्सूनचे आगमन ५ जूनपर्यंत महाराष्ट्रात होणार आहे, अशी खुशखबर हवामान खात्याने दिली आहे. यासोबतच यंदा सरासरी ओलांडून पाऊस बरसेल, असाही अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा सध्या तरी आनंदात आहे. मागील दोन-तीन वर्षांचे नुकसान विसरून तो पुन्हा नव्या उमेदीने मान्सूनपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. पारा ४७ अंशापार गेला आहे. तरीही बळीराजा तप्त उन्हात पुन्हा आपल्या शेतात दिसू लागला आहे.
मागील दोन वर्ष सातत्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. खरीपाने शेतकऱ्यांना दगा दिला. मागील वर्षी शेतकरी मोठ्या उत्साहाने जूनच्या प्रारंभीच खरीपासाठी तयार झाला होता. मशागतीची कामे आटोपली. सर्वात कठीण असलेली पैशाची जुळवाजुळवही केली. बियाणे, खतांची खरेदी केली. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. पावसाचे आगमन झाले नाही. याशिवाय मागील वर्षी अलनिनोचाही प्रभाव पावसाळ्यावर जाणवला. त्यामुळे पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला.
परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. दुसरीकडे शेतमालालाही भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला.
यावर्षी प्रारंभापासून हवामान खात्याकडून पावसाबाबत चांगला अंदाज वर्तविण्यात येत आहे. ३० मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. ५ जूनपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून सक्रीय होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच आनंदात आहे.
यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे यंदातरी चांगले पीक हाती येईल आणि आर्थिक परिस्थिती संकटातून बाहेर पडेल, या आशेने शेतकरी नव्या दमाने कामाला लागला आहे.
हंगामपूर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. उन्हाची काहिली वाढली आहे. सुर्याचा पारा ४७ अंशापार गेला आहे. तरीही पोटाची खळगी बळीराजाला घरी स्वस्थ बसू देत नसल्याने तो तप्त उन्हातही शेतात राबताना दिसून येत आहे. शेतातील कचरा, अनावश्यक झुडुपे तोडणे, ताटव्याचे कम्पाऊंड बांधणे, बांध्या व्यवस्थित करणे, शेतात शेणाचे खत टाकणे, नांगर, वखर व्यवस्थित करून ठेवणे आदी कामे शेतकरी करीत असताना दिसून येत आहे. एकूणच बळीराजा शेतात रमायला लागला आहे.
चार लाख ७६ हजारांवर खरिपाचा पेरा
सन २०१७-१८ मध्ये खरीप हंगामाकरिता चार लाख ७६ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात एक लाख ८० हजार ३६८, सोयाबिन ८० हजार ७९३, कापूस एक लाख ६९ हजार ३४९, तुर ४९ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हयाला विविध पिकांकरिता एकूण ७५ हजार ९९९ क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. जिल्हयास खरीप हंगामाकरिता एक लाख २२ हजार ६०० मेट्रीक टन रासायानिक खतांचे आवंटन आहे.
कर्जासाठी धावपळ
खरीप हंगाम तोंडावर असला तरी शेतकऱ्यांचा खिसा रिकामा आहे. खरीप हंगामासाठी त्याला पुन्हा पैशाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा कर्जासाठी बँकेच्या चकरा मारताना दिसून येत आहे. काही शेतकरी तर पुन्हा सावकरांकडे याचना करताना दिसत आहेत.