वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून लस द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:50+5:302021-04-20T04:29:50+5:30
चंद्रपूर : कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या तसेच मृत्यूदरही सातत्याने वाढत आहे. परिणामी राज्य सरकारने संचारबंदी लागू ...

वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून लस द्यावी
चंद्रपूर : कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या तसेच मृत्यूदरही सातत्याने वाढत आहे. परिणामी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र वीज क्षेत्रात कार्यरत अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कामावर जावे लागत आहे. मात्र त्यांना अद्यापपर्यंत लसीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
सद्यस्थितीत कोरोनाच्या संकटापासून काही प्रमाणात दूर राहण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लस द्यावी, अशी मागणी सबाॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. मात्र अद्यापपर्यंत काहीच उपयोग झाला नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षभरापासून कोरोना संकट आले आहे. लाॅकडाऊन काळामध्ये सर्व नागरिक घरी असतानाही वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनेत घेऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांना सुविधा दिली. दरम्यान, यावर्षीसुद्धा कोरोना संकटाने तोंड वर काढले आहे. आता संचारबंदीसुद्धा लागू करण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर पडण्यावरही निर्बंध आले आहेत. असे असले तरी वीज क्षेत्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना कामावर जावे लागत आहे. राज्यभरात वीज कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ हजार ८७९ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आले असून यातील १७३ कर्मचाऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र शासन पातळीवर ऊर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा मिळाला नसल्याने या कर्मचाऱ्यांना लसीकरणापासून वंचित रहावे लागले आहे. यामुळे वीज कर्मचारी, अभियंत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ऊर्जा क्षेत्रातील कर्मचारी, अभियंत्यांना लसीकरणासंदर्भात पाऊल उचलावे, अशी मागणी सबाॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे सरचिटणीस संजय ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, सद्स्यांनी केली आहे.