तीन 'वार', एका 'कर'भोवती सत्ता गणित, महायुती, महाआघाडीची एकजूट कठीण!
By राजेश भोजेकर | Updated: December 19, 2025 11:54 IST2025-12-19T11:53:26+5:302025-12-19T11:54:02+5:30
भाजपपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान : काँग्रेस गड परत मिळविण्यासाठी लढणार; बसपा, मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना ताकद दाखवणार

तीन 'वार', एका 'कर'भोवती सत्ता गणित, महायुती, महाआघाडीची एकजूट कठीण!
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर चंद्रपूरात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात विस्तव जात नाही. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात एकवाक्यता दिसत असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांत ती नाही त्यामुळे प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत असलेल्या या पालीकेत. या तीन 'वार' आणि एका "कर'ची राजकीय कसोटी ठरणार आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत संगिता अमृतकर यांचा रूपाने काँग्रेसला पहिल्या महापौर मिळाल्या. मात्र अतंर्गत गटबाजीने काँग्रेसला खिळखिळे केले. २०१७ च्या मनपा निवडणुकीत भाजपने आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात झेंडा फडकाविला असला तरी आता ही निवडणूक मात्र भाजप व काँग्रेससाठीही सहज सोपी दिसत नाही. जी गटबाजी काँग्रेसमध्ये होती. ती यावेळी भाजपत दिसत आहे. काँग्रेसमध्येही सत्तासंघर्ष तीव्र असल्याने महायुती- महाआघाडीत फाटाफूट दिसत आहे. दूसरीकडे बसपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे याची भूमिका निर्णायक असल्याने चुरस वाढली आहे.
एकूण प्रभाग किती आहेत? - १७
एकूण सदस्य संख्या किती? - ६६
कोणते मुद्दे निर्णायक?
शहरातील वाढते अतिक्रमण, १ अनधिकृत बांधकामे, अरुंद रस्ते, वाहनतळाचा अभाव, अमृत पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा, वाढते प्रदूषण.
इरईच्या प्रतिबंधित रेषेत झालेली २ बांधकामे, मलनिस्सारण सिव्हरेज प्रकल्पाला विलंब, घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी.
वाहत नसलेल्या शहरातील नाल्या, गल्लीबोळातील रस्त्यांची समस्या, नागरिकांना सोई-सुविधांचा अभाव, रखडलेले प्रकल्प, बाजारपेठेतील दूरवस्था हे मुद्दे निर्णायक ठरतील.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
भाजप - ३६
शिवसेना - ०२
राष्ट्रवादी काँग्रेस - ०२
काँग्रेस - १२
बसपा - ०८
मनसे - ०२
इतर - ०४
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?
एकूण - ३,०२,०५७
पुरुष - १,५४,७४७
महिला - १,४७,३०१
इतर - ०९
आता एकूण किती मतदार ?
एकूण - २,९९,९९४
पुरुष - १,४९,६०९
महिला - १,५०,३५४
इतर - ३१
मतदारसंख्या घटली, महिला मतदार वाढले, लाभ कुणाला होणार?
महानगरपालिकेतील मतदार संख्या वाढण्याऐवजी १ टक्क्याने घटली आहे. मात्र महिला मतदार वाढले आहेत. लाडकी बहिण निर्णायक ठरतील.