गरीबी हटावचा नारा हवेत विरला
By Admin | Updated: October 3, 2014 01:22 IST2014-10-03T01:22:03+5:302014-10-03T01:22:03+5:30
काँग्रेसने ‘गरीबी हटाव’चा नारा दिला मात्र या देशातील गरीबी थोडीही कमी झाली नाही.

गरीबी हटावचा नारा हवेत विरला
चंद्रपूर/नागभीड : काँग्रेसने ‘गरीबी हटाव’चा नारा दिला मात्र या देशातील गरीबी थोडीही कमी झाली नाही. हा नारा असाच हवेत विरला. याउलट राज्यातील सत्ताधारी नेत्यांची गरीबी दूर झाली. जनतेला न्याय हवा असेल तर राज्यात सत्ताबदल करा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपुरातील प्रचार सभेत केले.
चंद्रपूर आणि नागभीड येथे आज गुरूवारी भाजपाची प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रपुरातील सभेत खासदार हंसराज अहीर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले प्रामुख्याने उपस्थित होते. तर नागभीड येथील संभामध्ये खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य प्रा. अनिल सोले, आमदार मितेश भांगडिया, आमदार अतुल देशकर, वसंत वारजुकर, आदींची उपस्थिती होती. नितीन गडकरी यांनी मोदींच्या १८० दिवसातील विविध विकास कामांचा उल्लेख केला. गोसीखुर्द प्रकल्प, नागभीड- नागपूर रेल्वे ब्रॉडगेजच्या कामास गती यावी, यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले. तसेच नागपूर- गडचिरोली या राज्य मार्गाचे चौपदरीकरणास मंजूरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अन्य उपस्थितांचे भाषणे झाली. (प्रतिनिधींकडून)