चंद्रपूर जिल्ह्यातील धानपट्ट्यात ‘पोटोंडी’ पद्धत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:01+5:302021-06-22T04:20:01+5:30

नागभीड : धानपट्ट्यात हंगामाच्या संदर्भात अनेक पद्धती प्रचलित होत्या. ‘पोटोंडी’ ही त्यापैकीच एक. बियाणांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही ...

Potondi method closed in paddy fields in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील धानपट्ट्यात ‘पोटोंडी’ पद्धत बंद

चंद्रपूर जिल्ह्यातील धानपट्ट्यात ‘पोटोंडी’ पद्धत बंद

Next

नागभीड : धानपट्ट्यात हंगामाच्या संदर्भात अनेक पद्धती प्रचलित होत्या. ‘पोटोंडी’ ही त्यापैकीच एक. बियाणांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही हे तपासून बघण्याची ‘पोटोंडी’ ही पद्धत दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत चांगलीच प्रचलित होती. मात्र, सध्या ही पद्धत बंद झाल्यासारखीच स्थिती आहे.

सद्य:स्थितीत धानपट्ट्यात आवते व पऱ्हे भरण्याचा हंगाम जोरात सुरू आहे; पण सद्य:स्थितीत शेतकरी पोटोंडी पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत नाही. कृषी केंद्रांवरून बियाणे घेतले की, सरळ शेतावर नेत असून लगेच आवते आणि पऱ्ह्याची भरणी करीत आहेत.

पोटोंडी टाकण्याची एक पद्धत होती. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर शेतकरी आवते आणि पऱ्ह्याच्या जागेची अगोदर मशागत करायचे. नंतर पावसाला सुरुवात झाली की, घरीच साठवून ठेवलेल्या बियाणांमध्ये उगवण क्षमता आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी पोटोंडी या पद्धतीचा उपयोग व्हायचा. यासाठी साठवून ठेवलेल्या बियाणांमधून ओंजळभर धान्य काढून ते कापसाच्या बोळ्यामध्ये टाकले जायचे. नंतर हा बोळा पानांपासून बनविलेल्या द्रोणात ठेवला जायचा. आवश्यकतेनुसार या बोळ्यात पाणी देण्यात येत होते. चार-पाच दिवसांत या धान्यांना अंकुर आले नाही तर या बियाण्यांमध्ये उगवण क्षमता नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात यायचे आणि लगेच हे शेतकरी दुसऱ्या बियाण्यांची तजवीज करायचे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर टळायचे. त्याचबरोबर नंतर उगवण क्षमता असलेल्या बियाण्याचा वापर करून वेळेवर हंगामही करता यायचा.

पण आता काळ बदलला आहे आणि काळाबरोबर काळाच्या व्याख्याही बललल्या आहेत. शेतीत मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला आहे. घरीच तयार केलेले बियाणे साठवून ठेवण्याची पद्धत जवळपास बंद झाली आहे. त्याऐवजी कृषी केंद्रांमधून तयार बियाणे घेऊन त्यांचेच आवते व पऱ्हे टाकण्याची पद्धत रूढ झाली आहे. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांची फसगत होत असते. कृषी केंद्रांमधून खरेदी केलेले बियाणे काहीवेळा उगवलेच नाही, अशा तक्रारी अनेकदा कानावर येत असल्या तरी शेतकऱ्यांनी पोटोंडीकडे पाठ फिरवली हेही तेवढेच खरे आहे.

कोट

पूर्वी आम्ही पोटोंडी या पद्धतीचा उपयोग करीत होतो. त्यामुळे बियाण्यात उगवण क्षमता आहे की नाही हे लक्षात यायचे; पण आता या पद्धतीचा शेतकरी वापर करताना दिसत नाही.

- बाळाजी सातपैसे, शेतकरी नवखळा.

Web Title: Potondi method closed in paddy fields in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.