लोकसंख्या वाढ निसर्ग आणि विकासाला घातक
By Admin | Updated: July 11, 2017 00:30 IST2017-07-11T00:30:34+5:302017-07-11T00:30:34+5:30
निसर्ग नियमानुसार प्रत्येक प्रजातीची संख्या मर्यादित असली पाहिजे. अन्यथा समतोल बिघडतो.

लोकसंख्या वाढ निसर्ग आणि विकासाला घातक
जागतिक लोकसंख्या दिन : शासनाने कठोर पावले उचलावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : निसर्ग नियमानुसार प्रत्येक प्रजातीची संख्या मर्यादित असली पाहिजे. अन्यथा समतोल बिघडतो. परंतु पृथ्वीवरील मानवाची अति लोकसंख्या ही निसर्ग, पर्यावरण आणि विकासासाठी घातक ठरत आहे.
आज जगाची लोकसंख्या ७ अब्ज ५१ कोटी ८० लाख ८८ हजार ७०० असून भारताची १ अब्ज ३३ कोटी ३६ लाख ५७ हजार ४०० आहे. त्यात अनुक्रमे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार आघाडीवर आहेत. ही लोकसंख्या मानवासहित निसर्ग पर्यावरणाची प्रचंड हाणी करीत आहे. यावर आळा बसण्यासाठी त्वरित कठोर उपाय योजना न केल्यास सर्व जंगल, वन्यजीव नाहीसे होण्याची भीती आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि जल वायू परिवर्तन मंत्रालयाचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.
विज्ञान, वैद्यक तंत्रज्ञानामुळे मृत्यू दर कमी झाला आहे. पोषक आहार पुरवठा वाढला असून आयुष्य वाढले आहे. बाल मृत्यू कमी झाले, मात्र जन्म दर वाढला आहे. त्यामुळे भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढली. जगाची लोकसंख्या आज ७ अब्ज ५१ कोटी ८० लाख ८८ हजार ७०० झाली असून शतकाशेवटी ती १२ बिलियन होण्याची शक्यता आहे. दर दिवशी जगात १ लाख २८ हजार ४२८ मुले जन्म घेतात. तर केवळ ५३ हजार १०७ लोक मृत्यू पावतात. त्यामुळे दरवर्षी जगात ४ कोटी २६ लाख १ हजार ८८८ लोकांची वाढ होते. त्यात ५० टक्के पुरुष आणि ४९.६ टक्के स्त्रीयांचे आहे. चीनची लोकसंख्या आज १ अब्ज ३८ कोटी ६२ लाख ७० हजार ९४६ तर अमेरिकेची ३४ कोटी २४ लाख ७० हजार १३ आहे. चीनने लोकसंख्येवर नियंत्रण मिळविले असून येत्या २० वर्षांत भारत जगात लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर येईल, ही खेदाची बाब असेल. भारतात उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९ कोटी ९२ लाख ८१ हजार ४७७ तर महाराष्ट्राची १२ कोटी ३१ लाख ७४ हजार ९१८ इतकी आहे. बिहार तिसऱ्या स्थानावर असून १० कोटी ३८ लाख ४ हजार ६३७ एवढी या राज्याची लोकसंख्या आहे.
नैसर्गिक समस्यांचे परिणाम भोगावे लागणार
वाढलेल्या लोकसंख्येसाठी मोठ्या प्रमाणावर राहायला, शेतीसाठी, उद्योग, वाहतूक आणि विकास कामासाठी जागा हवी असते. मोठ्या प्रमाणावर अन्न लागते. नोकऱ्या, व्यवसाय आणि आर्थिक तरतूद करावी लागते. केवळ मानवाच्या या सर्व गरजांसाठी आपणास आज जंगले, वन्यजीव, नद्या, डोंगर आणि जीवनदायी चांगल्या पर्यावरणाचा बळी देत आहोत. परंतु आपण आपला विकास क्रम कसा झाला, हे विसरलो आहोत. हेच जंगल, पशु पक्षी आणि पर्यावरण मानवाला जिवंत ठेवते आणि निसर्ग उध्वस्त झाला तर मानव सुद्धा जगणार नाही, हेही विसरलो. केवळ लोकसंख्या वाढीमुळे औद्योगीकरण, प्रदूषण, जंगल तोड, वृक्षतोड होत आहे. यातून तापमान वाढ, हवामान बदल सुरू झाला आहे. अधिवास नष्ट झाल्यामुळे वन्यजीव आणि त्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. जंगले तोडून शेती आणि उद्योग, खाणी येत असल्यामुळे बारमाही नद्या आटल्या, जल स्त्रोत कमी झाले, पाण्याचे प्रदूषण झाले, हवा, भूमी प्रदूषित झाली, नैसर्गिक खनिजे, डोंगर नष्ट होत आहेत. भविष्यात याचे परिणाम भोगावे लागणार आहे.
मानव विकास संबंधी अनेक समस्या निर्माण होणार
आपण ज्याला मानव विकास म्हणतो, खर तर तो मानव विनाश आहे. हे मागील शासन-प्रशासन आणि राज्यकर्त्यांना का कळले नाही, हे कोडेच आहे. हा विनाश हवामान बदल, तापमान वाढ, अनियमित पाऊस, नैसर्गिक आपत्ती या रूपाने आज आपल्यासमोर उभा आहे. लोकसंख्येमुळे अन्न सुरक्षेची, गरीबी, बेरोजगारी, गुन्हेगारीची, आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्योग आणि कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे देशाचा विकास दर कमी होत आहे. तंत्रज्ञान वाढल्यामुळे मानव शक्ती ऐवजी मशीनचा वापर उद्योगात होत आहे. त्यामुळे आधीच बेरोजगारी वाढली आहे. कुटुंब नियोजन, स्त्री शिक्षण, जन जागरण आणि शासनातर्फे कठोर कायदे व कृती कार्यक्रम आखून लोकसंख्या नियंत्रणात आणणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचसोबत वाढलेल्या लोकसंख्येसाठी मशीन्स ऐवजी क्रिया शक्तीचा रोजगार निर्मितीसाठी योग्य वापर करावा लागणार आहे.
मानव विकासासाठी वनांचा, वन्यजीवांचा, पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला तर येत्या ५० वर्षात प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्याला पृथ्वीवर जगणे कठीण जाणार आहे. आपल्या भावी पिढींचे जीवन कसे असेल, याची कल्पना करणे कठीण आहे. निसर्ग टीकला तर आपण जगू अन्यथा सर्वांचा मृत्यू अटळ आहे. म्हणून सर्व समस्येचे मूळ हे लोकसंख्या वाढ असून ती कमी केलीच पाहिजे.
- प्रा. सुरेश चोपणे
पर्यावरण अभ्यासक तथा
अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी चंद्रपूर.