पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण
By Admin | Updated: September 16, 2014 23:38 IST2014-09-16T23:38:27+5:302014-09-16T23:38:27+5:30
वातावरणातील होणारा बदल, तापमानातील चढउतार व अवेळी येणारा पाऊस, यामुळे पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण झाली आहे. पोंभुर्णा शहरही या आजाराने ग्रासले आहे.

पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण
देवाडा (खुर्द) : वातावरणातील होणारा बदल, तापमानातील चढउतार व अवेळी येणारा पाऊस, यामुळे पोंभुर्णा तालुक्यात विविध साथरोगांची लागण झाली आहे. पोंभुर्णा शहरही या आजाराने ग्रासले आहे. शहरातील स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
सर्दी, खोकला, थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे, कंबरदुखी, मळमळ होणे, डोळे दुखणे आदि आजारांचे प्रमाण वाढू लागल्याने पोंभुर्णा तालुका परिसरातील खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही बाह्यरुग्णांची संख्या वाढली आहे. परिसरामध्ये अधुन-मधुन पावसाची रिमझीम सुरूच आहे. यामुळे तालुक्यातील गावागावांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध आजारात वाढ होत आहे. मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेतल्यास संबंधित आजार बरे होवू शकतात. हवा आणि अन्नातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुंमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, उलट्या येणे, अतिसार यासारख्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येवरून ही बाब दिसुन येत आहे. साथीची लागण सुरू असल्याने खासगी व सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी व विहीरींमध्ये दूषित पाणी आहे. नळाद्वारे त्याच पाण्याचा पुरवठा होत असल्याने जलजन्य आजारात वाढ होत आहे. (वार्ताहर)