राजकीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी
By Admin | Updated: April 6, 2016 00:46 IST2016-04-06T00:46:39+5:302016-04-06T00:46:39+5:30
सिंदेवाही नगर पंचायतीची निवडणूक मे किंवा जून महिन्यात होईल असा अंदाज आहे. यासाठी नगरपंचायतमधील १७ वॉर्डांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

राजकीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी
महिला आरक्षण : सिंदेवाही नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध
बाबुराव परसावार सिंदेवाही
सिंदेवाही नगर पंचायतीची निवडणूक मे किंवा जून महिन्यात होईल असा अंदाज आहे. यासाठी नगरपंचायतमधील १७ वॉर्डांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. वॉर्ड क्रमांक एक- साधारण, वार्ड क्रमांक दोन अनुसूचित जाती, वॉर्ड क्रमांक तीन - सर्वसाधारण महिला, वॉर्ड क्रमांक तीन- नामाप्र महिला, वॉर्ड क्रमांक पाच - सर्वसाधारण महिला वॉर्ड क्रमांक सहा- अनुसूचित जाती महिला, वॉर्ड क्रमांक सात- अनुसूचित जाती महिला, वॉर्ड क्रमांक आठ - नामाप्र महिला, वॉर्ड क्रमांक नऊ- नामाप्र महिला, वॉर्ड क्रमांक १० - सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक ११ नामाप्र, वॉर्ड क्रमांक १२ नामाप्र, वॉर्ड क्रमांक १३ - सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक १४ सर्वसाधारण, वार्ड क्रमांक १५ - सर्वसाधारण महिला, वार्ड क्रमांक १६ - अनुसूचित जमाती, वॉर्ड क्रमांक १७ - अनुसूचित जमाती महिला यामधील नऊ वॉर्ड महिलांकरिता आरक्षित झाले आहेत. एकूण मतदार १४ हजार १५७ असून त्यामध्ये अनुसूचित जाती २,४८८ तर अनुसूचित जमाती १,४६४ आहे. मात्र आरक्षणाने अनेक प्रस्थापित उमेदवारांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. सध्यस्थितीत सिंदेवाही पंचायत समिती व सहकारी राईस मिलमध्ये काँग्रेसचे वर्चस्व तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे.
या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी व इतर गटातर्फे जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गटाचा उमेदवार शोधणे सुरू केले असून त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी कागदपत्र जमा करण्यात मग्न झाले आहेत. महिला आरक्षणामुळे जागा कशा भरून काढाव्या हा प्रश्न सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपुढे आ वासून उभा आहे. कोणाला फोडायचे व कोणाला जोडायचे, कुठला गट आपल्याकडे वळवायचा याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गुप्त बैठकी सुरू आहेत. या नगर पंचायत निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेवर येणार, आपल्या वॉर्डातून कोणता उमेदवार विजयी होणार व कोणता पडणार, याविषयी मतदारांमध्ये चर्चा सुरू असून प्रथमच नगरपंचायतीच्या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होईल, असे चित्र दिसून येत आहे. या निवडणुकीत निस्वार्थ, सुशिक्षित, पदवीधर, व्यावहारिक व कायद्याचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीलाच निवडून दिल्यास नगराचा विकास होईल, असे मतदार बोलताना दिसत आहेत.
वाढलेली बेरोजगारी, गावातील अनियमित पाणीपुरवठा, रस्त्याची दुर्दशा, ढासळलेली आरोग्य सेवा, स्मशानभूमी व समाज मंदिराची दुर्दशा या समस्या १५ वर्षांपासून कायम आहेत. नगर पंचायत निर्मितीसाठी सिंदेवाहीवासियांना संघर्ष करावा लागला. ग्रामपंचायतऐवजी नगर पंचायत झाल्याने विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नगरसेवकपदाची स्वप्ने बाळगणाऱ्यांनी विविध पक्षाकडे राजकीय सेटिंग सुरू केले आहे.