पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:36+5:302021-04-24T04:28:36+5:30
जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच समोर असणारे पोलीस बांधव लसीकरणातही समोर आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार २२६ अधिकारी ...

पोलीसदादा, स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या
जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच समोर असणारे पोलीस बांधव लसीकरणातही समोर आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार २२६ अधिकारी व पोलिसांनी लस घेतली. एक हजार ७९५ पोलिसांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची प्रमुख भूमिका असते. कोरोना काळात अत्यंत जोखीम असताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले होते. कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुन्हा कामाची जबाबदारी वाढली. कर्तव्य बजावताना काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्याचे आदेश होते. मार्च महिन्यात पोलिसांचे लसीकरण सुरू झाले. अनेक विभागांनी लसीकरणाकडे कानाडोळा केला असला तरी पोलीस विभागांनी गांभीर्याने घेतले. जिल्ह्यात पोलीस अधिकारी व अंमलदारांची संख्या २९१६ आहे त्यापैकी १९५ अधिकारी २७२१ पोलीस अंमलदार असे एकूण २९१६ कर्मचारी कार्यरत आहेत. दूसऱ्या टप्प्यात १३० अधिकारी, १६६५ अंमलदार असे एकूण १७९५ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणालाही पोलिसांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
महिला पोलिसांचे लसीकरण पूर्ण
कोरोना लढ्यात फ्रंटलाईन वॉरिअर म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोविड प्रतिबंधक लसीकरणालाही सर्वच कर्मचारी पुढाकार घेत आहेत. महिला पोलीसही यात मागे नाही. त्यामुळे त्यांचीही टक्केवारी अंतिम टप्प्यात आहे. कोरोनाच्या लसीबाबत सुरुवातीला अनेक समज-गैरसमज पसरविण्यात आले होते. पहिला टप्पा हा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी होता. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फ्रंटलाईन वॉरिअर असलेल्यांचे लसीकरण सुरू झाले. पोलिसांनी सर्वाधिक जबाबदारी पार पाडली.
बाबा, आम्ही घरी वाट पाहतोय....
कोरोना पुन्हा वाढत आहे. त्यामुळे सर्वच नागरिक भयभीत झाले आहेत. अशा स्थितीत पोलिसांचे काम अत्यंत जोखमीचे झाले आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना अडविताना संपर्क वाढतो. यातून कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे बाबा घरी परत येताना काळजी वाटते.
-राधिका शेंडे, बाबूपेठ चंद्रपूर
कोरोना खूप वाढला. माणसे मरत आहेत. पण, बंदोबस्तासाठी पोलिसांना कर्तव्यावर राहावेच लागते. आता जिल्हाबंदी लागू झाल्याने जबाबदारी वाढली आहे. पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक सुरक्षा साधने पुरविली आहेत. परंतु, कर्तव्य बजावताना बाबांनी काळजी घेतली पाहिजे.
-श्रीकांत देशमुख, तुकूम चंद्रपूर