चंद्रपूर : शहरातील जलनगर वाॅर्डातील खंजर मोहल्ला व बंगाली कॅम्प परिसरात रामनगर पोलिसांनी पाच ठिकाणी धाडसत्र राबवून सुमारे २२ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जलनगरमधील खंजर मोहल्ल्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या आदेशानुसार रामनगर पोलिसांनी अवैध दारूविक्रीच्या विरोधात 'ऑल आऊट' मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत खंजर मोहल्ल्यातील सागर रामकिशोर कंजरकडून तीन लाख ८० हजार, आतिश रामकिशोर कंजरकडून पाच लाख ४० हजार, मुन्नीबाई हरी कंजरकडून तीन लाख ६० हजार, मंदा रामकिशोर कंजर, रामेश रामकिशोर कंजर, दिलीप रामकिशोर कंजर यांच्याकडून आठ लाख १० हजार रुपये तसेच बंगाली कॅम्प परिसरातील प्रशांत नकुल विश्वासकडून दोन हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रामनगरचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मलिक, एकरे, गजानन डोईफोडे, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पुरुषोत्तम चिकाटे, संजय चौधरी, किशोर वैरागडे, आदींनी केली.