कोरोनाच्या सावटात मोठ्या बैलांचा पोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:01:07+5:30
जिल्ह्यातील बल्लारपूर, गोंडपिपरी व घुग्घुस शहरात जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा फटका बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागावर दिसून आला. विसापूर या गावात बैलांना सजवून दरवर्षीप्रमाणे गावाच्या मुख्य चौकात येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी आल्या पावलीच परत पाठवित होते. अखेर शेतकऱ्यांनी घरीच बैलांची पूजा करून पोळ्याचा सण साजरा केला.

कोरोनाच्या सावटात मोठ्या बैलांचा पोळा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दरवर्षी शेतकरी पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडले. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर तालुक्यातील विसापूरचा पोळा प्रसिद्ध आहे. यंदा बैल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी हाकलून लावले.
जिल्ह्यातील काही भागात बैलांना सोशस डिस्टन्सिंग ठेवून ऊभे करावे लागले. कोरोनामुळे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या दिवसाला शेतकरी बांधव उत्साहात हा सण साजरा करायचा. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील निरुत्साह स्पष्ट जाणवत होता. जिल्ह्यातील बल्लारपूर, गोंडपिपरी व घुग्घुस शहरात जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा फटका बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागावर दिसून आला. विसापूर या गावात बैलांना सजवून दरवर्षीप्रमाणे गावाच्या मुख्य चौकात येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी आल्या पावलीच परत पाठवित होते. अखेर शेतकऱ्यांनी घरीच बैलांची पूजा करून पोळ्याचा सण साजरा केला.
लॉकडाऊनमध्येही बल्लारपुरात पोळा
बल्लारपूर : शहर पाच दिवसासाठी लॉकडाऊन आहे. कोरोनामुळे सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले. मात्र शहरी भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी वस्ती विभागातील गांधी पुळ्याजवळ बैलजोड्या आणून उत्साहात पोळा साजरा केला. प्रशासनाच्या सुचनांचेही पालन केले. यंदा गांधी पुतळ्यासमोर १० शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या उभ्या केल्या होत्या. काही वेळानंतर गुढी फिरवून पोळा फोडण्यात आला. बैलपोळा पाहण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. बामणी येथे शेतकरी दरवर्षी हनुमान मंदिराच्या पटांगणावर पोळा भरवितात. मात्र, कोरोनामुळे बामणीतही लॉकडाऊन आहे. बैलाविषयी कृतज्ञता म्हणून गावातील शेतकऱ्यांनी मंदिराजवळून आज बैलजोड्या फिरविल्या. अनेकांच्या घरी नेल्या. पोळा हा सण शेतकºयांसाठी महत्त्वाचा आहे.परंतु कोरोना संकट काळात यंदा मनासारखा साजरा करता नाही.