प्लॅटफाॅर्म तिकीट दर वाढले, मात्र गर्दी ओसरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:16+5:302021-03-15T04:26:16+5:30

चंद्रपूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर वाढविण्यात आले आहे. मात्र तरीही स्थानकावरील गर्दी ...

Platform ticket prices increased, but the crowd did not oscillate | प्लॅटफाॅर्म तिकीट दर वाढले, मात्र गर्दी ओसरेना

प्लॅटफाॅर्म तिकीट दर वाढले, मात्र गर्दी ओसरेना

चंद्रपूर: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर वाढविण्यात आले आहे. मात्र तरीही स्थानकावरील गर्दी ओसरलेली नसून प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे ठप्प होती. आता हळूहळू रेल्वे रुळावर येत आहे. प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे काही मोजक्या रेल्वेगाड्या सुरू केल्या. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षित तिकीट महत्त्वाचे करण्यात आले आहे. सर्वसामान्य बोग्या बंद करण्यात आल्या. रेल्वे स्थानकावर केवळ प्रवाशांनाच येऊ दिल्या जात होते. त्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना मात्र फलाटावर येण्यास मनाई करण्यात आली होती. आता हळूहळू रेल्वेगाड्यांची सख्या वाढविण्यात आली. त्यामुळे रेल्वे फलाटांवर प्रवाशांसह त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्याही वाढू लागली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वी १० रुपये असलेले प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर वाढवून ३० रुपये करण्याचा निर्णय घेतला. पण तरी देखील प्रवाशांसह त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांची गर्दी कमी झाली नाही. रेल्वे स्थानकावर काम नसतानाही फिरणाऱ्यांवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान लक्ष ठेवून आहेत. असे लोक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहेत.

तरीही विकली गेली फ्लॅटफॅार्म तिकिटे

रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर गर्दी कमी करण्यासाठी फ्लॅटफॅार्म तिकिटांमध्ये वाढ केली असून आता नागरिकांना प्लॅटफाॅर्म तिकीट काढण्यासाठी ३० रुपये मोजावे लागत आहे. मात्र शनिवार तसेच रविवारी मोठ्या प्रमाणात प्लॅटफाॅर्म तिकीट विकल्या गेल्याची माहिती मिळाली आहे.

कोट

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतानाही रेल्वे प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होती. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीट वाढ करण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात गर्दीवर नियंत्रण आली आहे.

-एम.एन. बेग

टीटीआयई, बल्लारशाह

--

२५ गाड्यांची ये-जा

चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून दररोज २० ते २५ रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. चंद्रपूरमध्ये काही गाड्या थांबत नाही. मात्र बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबतात. कोरोनच्या संकटामुळे पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. केवळ सुपरफास्ट गाड्या, स्पेशल गाड्यांची धडधड स्थानकावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

--

हजार ते बाराशे प्रवाशांचा प्रवास

मध्य रेल्वेचे चंद्रपूर तसेच बल्लारपूर स्थानक महत्त्वाचे आहे. येथून चेन्नई, दिल्ली तसेच अन्य मार्गाकडे मोठ्या प्रमाणात रेल्वे धावतात. कोरोनामुळे काही प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत नाही. असे असले तरी दररोज सरासरी हजार ते बाराशे प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Platform ticket prices increased, but the crowd did not oscillate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.