नियोजन कागदावर, कोविड रुग्ण वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST2021-04-20T05:00:00+5:302021-04-20T05:00:35+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात रविवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४२ हजार २३१ वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्याही १० हजार ९८१ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या कोविड तपासण्यांचे लक्ष आहे. गत आठवड्यापर्यंत तीन लाख २९ हजार ८४६ नमुन्यांची तपासणी झाली. परिणामी, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. मात्र, रुग्णाचा शोध लागल्यानंतर सुविधांबाबतच्या दीर्घकालीन नियोजनाची अंमलबजावणी होण्यास मोठा विलंब होत आहे.

नियोजन कागदावर, कोविड रुग्ण वाऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऑक्सिजन पातळी ८३ पर्यंत खालावलेल्या गंभीर कोविड रुग्णांनाही शासकीय रुग्णालयात बेडस् मिळण्याचा मार्ग बंद झाला. मृतांची संख्याही वाढत आहे. खासगी रुग्णालयांत उपचार करण्याची गरिबांची क्षमता नाही. त्यामुळे बेड्स मिळेल काही नाही, याचा विचार न करता अखेरचा पर्याय म्हणून अश्रु गोठवून आपल्या जीवलग व्यक्तीच्या उपचारासाठी तेलंगणात जाण्याची घटना रविवारी पुढे आली.
चंद्रपूर जिल्ह्यात रविवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४२ हजार २३१ वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्याही १० हजार ९८१ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या कोविड तपासण्यांचे लक्ष आहे. गत आठवड्यापर्यंत तीन लाख २९ हजार ८४६ नमुन्यांची तपासणी झाली. परिणामी, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली. मात्र, रुग्णाचा शोध लागल्यानंतर सुविधांबाबतच्या दीर्घकालीन नियोजनाची अंमलबजावणी होण्यास मोठा विलंब होत आहे. ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड्सची क्षमता संपली. कोविडबाधित गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास बेड्स उपलब्ध नसल्याने आरोग्य प्रशासनाने हात टेकल्याचा वेदनादायी अनुभव रुग्णांच्या कुटुंबीयांना येत आहे. जिल्हा प्रशासनाने सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने ऑक्सिजनयुक्त खाटांची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.
केवळ डॅशबोर्डावरच बेड्स शिल्लक
जिल्ह्यात ऑक्सिजन ६४०, आयसीयू १७२ व व्हेंटिलेटर्स ७८ बेड्स ही संख्या केवळ शासकीय नव्हे तर यात खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. सोमवारी जनरल खाटांसह एकूण एक हजार १३१ खाटा उपलब्ध असून, शासकीय व खासगी अशा २५ रुग्णालयांची ही स्थिती आहे. सायंकाळी ६ वाजतापर्यंत एक हजार ८३ रुग्ण भरती आहेत. ऑक्सिजनचे ४ व व्हेंटिलेटरचे ५ बेड्स केवळ डॅशबोर्डवर शिल्लक आहेत.
शासकीय रूग्णालयांची क्षमता संपली
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन १४०, आयसीयू ४० व ४० व्हेंटिलेटर्स बेड्सची क्षमता आहे पण, सर्वच बेड्स फुल्ल असल्याने बेड्सअभावी कोविड रुग्ण भरती करणे थांबविले. राजुरा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या २३ बेड्स आहेत. आयसीयू, व्हेंटिलेटर्स बेड्सची व्यवस्था नाही. ऑक्सिजनच्या १७ व आयुसीयु २१ खाटांची क्षमता असलेल्या रामनगरातील महिला रुग्णालयात रामनगरात व्हेंटिलेटर्स बेड्स नाहीत. चंद्रपूर कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या ८० खाटा आहेत पण, व्हेंटिलेटर्स बेड्स नाही. एसडीएच वरोरा रूग्णालयातही आयुसीयू व व्हेंटिलेटर्स नाही. १८ ऑक्सिजन बेड्स आहेत. मात्र, त्या फुल्ल झाल्या. त्यामुळे कोविडबाधितांचे कुटुंबीय हादरले आहेत.
‘रस्त्यावर मरण्यापेक्षा तेलंगणात जाऊ’
चिमूर तालुक्यातून कोरोनाबाधित एका महिलेला उपचारासाठी कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून रविवारी दुपारी चंद्रपुरातील महिला रुग्णालयात आणले होते. बेड्स उपलब्ध नसल्याने अॅडमिट करून करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. रुग्णाला रुग्णवाहिकेतच ठेवून कुटुंबीयांनी सायंकाळी सहा वाजतापर्यंत वाट पाहिली. अखेरचा प्रयत्न म्हणून कुटुंबाने माध्यमांशी संपर्क साधल्यानंतर थोड्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, काही उपयोग न झाल्याने ‘रस्त्यावर मरण्यापेक्षा तेलंगणात नेऊ’ या शब्दांत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करून हे कुटुंब रात्री उशिरा तेलंगणाकडे रवाना झाले.