पोंभुर्ण्यात ‘व्हायरल फ्ल्यू’ चे थैमान
By Admin | Updated: October 14, 2015 01:20 IST2015-10-14T01:20:11+5:302015-10-14T01:20:11+5:30
वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे पोंभुर्णा शहरासह तालुक्यात विविध रोगाने थैमान घातले आहे.

पोंभुर्ण्यात ‘व्हायरल फ्ल्यू’ चे थैमान
आरोग्य सेवा कोलमडली : प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार
पोंभुर्णा : वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे पोंभुर्णा शहरासह तालुक्यात विविध रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी वाढली असून एका प्रभारी डॉक्टरच्या खांद्यावर संपूर्ण आरोग्य विभागाचा डोलारा असल्याने येथील आरोग्यय सेवा कोलमडली आहे. गेल्या महिन्यापासूनच वातावरणात सतत बदल होत आहे. या वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. ‘व्हायलर फ्ल्यू’ने तर नागरिकांना आता भंडावून सोडले आहे. लहान बालकांनाही विविध आजारानी ग्रासले आहे. त्यामुळे शहरातील खासगी दवाखाने सुद्धा गर्दीने फुलून गेले आहेत. त्यामुळे दवाखान्यात दररोज गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्दी, ताप, खोकला, अंग दुखणे, हुडहुडी भरुन ताप येणे आदी आजार तर आता सामान्य झाले आहे. अनेकांना या आजाराची लागण झाली आहे. त्यातूनच पुढे मलेरिया, डेंग्यूसदृश आजार डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिमागास आणि आदिवासी बहुल असलेल्या तालुका मुख्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी तालुक्यातील ४५ हजार रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेतात. सदर आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांंची पदे मंजूर आहेत. परंतु येथील कार्यरत दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची इतरत्र बदली झाल्याने डॉ. धनगे यांच्या खांद्यावर संपूर्ण आरोग्य केंद्राचा भार पडला होता. त्यांनी संपूर्ण आरोग्य सेवेचा भार सुद्धा पेलला. परंतु ४२ गावातील ४५ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी त्यासोबतच प्रसूती रुग्ण, पोलीस विभागातील केसेस, शवविच्छेदन, रात्रीचे वेळेतील आपतकालीन रुग्ण यामुळे त्यांच्यावर ताण पडल्याने त्यांच्याच प्रकृतीत बिघाड झाला आणि ते दीर्घ रजेवर गेले असल्याचे समजते. त्यामुळे येथील आरोग्य सेवा विस्कळीत होवू नये यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोगुलवार यांनी उमरी पोतदार येथील फिरत्या पथकावर कार्यरत असलेले डॉ. टेबे यांची तात्पुरती नियुक्ती केली. मात्र ते सुद्धा अल्पावधीतच कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणाचे कारण पुढे करुन रजेवर गेले. त्यामुळे परत पोंभूर्णा येथील आरोग्य सेवा विस्कळीत होवू नये यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बेंबाळ सर्कलमधील फिरत्या पथकावर कार्यरत असलेले डॉ. म्हैसेकर यांची तात्पुरती नियुक्ती केली आहे. हा प्रकार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक दिवसापासून सुरू असल्याने येथील नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिक खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
पोंभूर्णा तालुका हा उद्योग विरहीत तालुका असल्याने या परिसरामध्ये गरीबीचे प्रमाण फार मोठे आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यामध्ये जावून उपचार घेणे आर्थिक अडचणीमुळे शक्य होवू शकत नाही. पोंभूर्णा तालुक्यात सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध नसल्याने सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी व हवालदिल झाला आहे. आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या या शेतकऱ्यापुढे आरोग्यावर खर्च कुठून करायचा, असा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष वेधून येथे रिक्त असलेल्या पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
घोसरी परिसरात तापाची साथ
घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे आरोग्य केंद्राअंतर्गत घोसरी, दिघोरी परिसरातील गावांमध्ये तापाच्या साथीने थैमान घातले असल्याने रुग्णांवर आर्थिक संकट ओढावले आहे. कार्यरत प्रभारी वैद्यकीय अधिकारी सर्तकता दर्शविली आहे. तरीपण घोसरी उपकेंद्रात आरोग्य सेवक नसून सेविका मुख्यालयी राहत नसल्याने लागलीच प्राथमिक उपचार होत नसल्याने अनेक रुग्ण खासगी उपचार करवून आर्थिक भार पेलत आहेत. सद्य:स्थितीत वातावरण बदलामुळे घोसरी-दिघोरी परिसरात तापाच्या साथीने कुटुंबियातील अनेक रुग्ण बाधीत होत आहेत. रुग्णांमध्ये अंगदुखी, ताप, खोकला असे लक्षणे दिसत आहे. त्यातच अनेकांना टायफाईट आजाराने ग्रासले आहेत. त्यामुळे त्यांची झोप उडली आहे. घोसरी उपकेंद्र कार्यान्वित असले तरी दुरुस्तीच्या प्रतिक्षेत ओस पडलेले आहे. येथील आरोग्य सेवकाचे पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त आहे. तरिपण अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दर्शविलेली नाही. नवेगाव मोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ गावे समाविष्ट असून घाटकूळ, देवाडा (बुज), घोसरी, वेळवा, नवेगाव मोरे हे पाच उपकेंद्राचे व्याप्त क्षेत्र आहे. आरोग्याच्या दृष्टीने केंद्रातंर्गतची अनेक गावे संवेदनशील आहेत. केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी नियमितपणे असने गरजेचे आहे. परंतु एकच प्रभारी वैद्यकीय अधिकारी भार पेलत आहेत. त्यात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्याने रुग्ण सेवा सांभाळताना कसरत करावी लागत आहे. केंद्रातील घोसरी, फुटाणा, चेकफुटाणा, दीघोरी, पिपरी देशपांडे, घाटकुळ, चेकठाणेवासना व अन्य गावात तापाच्या साथीचा उद्रेक असून अनेक रुग्ण कवेत येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. आरोग्य विभागाने रुग्णांची गैरसोय लक्षात घेवून गावपातळीवर पथकाद्वारे उपचार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)