कोरोनाच्या संकटात लोकप्रतिनीधींनी जनतेला सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:51+5:302021-04-23T04:29:51+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या या संकटाचा सामना करताना भाजपचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी या ...

कोरोनाच्या संकटात लोकप्रतिनीधींनी जनतेला सहकार्य करावे
चंद्रपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या या संकटाचा सामना करताना भाजपचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी या नात्याने आपले सक्रिय योगदान देत मास्क, सॅनिटायझरचे वितरण नागरिकांमध्ये करत जनजागरण करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: आपल्या भागात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, याद़ष्टीने सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ३० हजार मास्कचे वितरण करण्याचे नियोजन आपण केले आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक यंत्रसामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी आमदार निधीच्या माध्यमातून खर्च करणार असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य, मूल व पोंभुर्णा येथील नगरसेवकांशी संवाद साधला. या संकटकाळात नागरिकांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन करत लोकप्रतिनिधींनी जनजागरण, लसीकरण व चाचण्या याकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिले. व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन बेड्स मागण्याची वेळच येऊ नये, म्हणून सुरुवातीपासूनच काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागरण अतिशय महत्त्वाचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर रुग्णांना आवश्यक ती मदत करावी, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास भाड्याची वाहने त्यांना उपलब्ध करून दयावी, असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सूचित केले. मूल शहरात चाचण्यांची संख्या वाढवावी, असे सांगत उपलब्ध असलेल्या दोन लसीकरण केंद्रांची संख्या चार करण्याबाबत आपण प्रशासनाशी चर्चा करू, असेही ते म्हणाले. पोंभुर्णा शहरात पाच हजार मास्क वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.