तपोभूमीतील नागरिकांनी केले गावात श्रमदान
By Admin | Updated: November 8, 2014 01:04 IST2014-11-08T01:04:32+5:302014-11-08T01:04:32+5:30
‘एक तरी हात खोदावी जमीन, तेची पुजनाहुनी पूजन’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे.

तपोभूमीतील नागरिकांनी केले गावात श्रमदान
पेंढरी (कोके) : ‘एक तरी हात खोदावी जमीन, तेची पुजनाहुनी पूजन’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे. याच धर्तीवर राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी पर्वावर गावकऱ्यांनी तपोभूमीत श्रमदान करुन राष्ट्रसंताला आदरांजली अर्पण केली.
दानात दान रक्तदान, तसेच दानात दान श्रमदान हेही घोषवाक्य आता पुढे येऊ लागले आहे. प्रा. नीळकंंठ लोनबले यांच्या संंकल्पनेतून सरपंच विष्णुदास मगरे, नामदेवराव घोडाम, संजय धारणे, चंद्रभान बारेकर, विजय श्रीरामे, गुलाम घोडाम, रमेश गायकवाड आदींंच्या परिश्रमातून राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी पर्वाचे औचित्य साधून तपोभूमीत श्रमदान केले. त्यापूर्वी तीन दिवस राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. यात सामुदायिक ध्यान, साधना, प्रार्थना, रामधून, स्वच्छता, रांगोळी स्पर्धा, सायकल स्पर्धा, भजन, कीर्तन असे उपक्रम साजरे करण्यात आले. यात विठ्ठलराव वाढई, सुधाकर चौधरी, हरीजी मेश्राम, दौलत घरत, रघुनाथ धारणे, मोरेश्वर सोनुले, भाऊराव वाढई, रुपचंद धारणे, इतर गावकरी व आश्रमशाळेचे विद्यार्थी- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
तीर्थक्षेत्र गोंदेडाचा विकास करा
राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा ‘क’ तीर्थक्षेत्र म्हणून जेव्हापासून घोषित झाली. तेव्हापासून ती विकासापासून अजूनपर्यंत उपेक्षित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बालपणी चिमूर तालुक्यातील गोंदेडा येथे तपश्चर्या केली. तेव्हापासून या साधनाभूमीला ‘तपोभूमी’ म्हणून संबोधतात. मागील तीन वर्षा अगोदर या तपोभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्रात सर्व जाती-धर्माचे लोक दर्शनासाठी येतात. पर्यटन वा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, यात्री निवास, सौंदर्यीकरण व पार्किंग आदी सुविधासाठी शासन दरवर्षी चार ते पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देतो. त्यासाठी संबंधित तहसीलदारांनी सदर तीर्थस्थळावर एक वर्षात एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी किंवा यात्रा स्थळाची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करावी लागते. गोंदेडा तीर्थस्थळावर दरवर्षी पौष पोर्णिमेला यात्रा भरते. त्या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात व वर्षभर धरुन दीड लाखाच्यावर भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु हे तीर्थक्षेत्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अजुनही विकासापासून कोसोदूर आहे. नवीन सरकारने या क्षेत्राचा विकास करावा, अशी मागणी परिसरातील गुरुदेव भक्तांनी केली आहे.