कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आनंदवनवासी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:46 IST2021-05-05T04:46:58+5:302021-05-05T04:46:58+5:30
वरोरा : कुठलेही संकटे आले तरी आनंदवन महारोगी सेवा समिती कुठलाही गाजावाजा न करता मदतीसाठी समोर राहते. सध्या कोरोना ...

कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आनंदवनवासी सरसावले
वरोरा : कुठलेही संकटे आले तरी आनंदवन महारोगी सेवा समिती कुठलाही गाजावाजा न करता मदतीसाठी समोर राहते. सध्या कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. यामध्ये गरजूंना मदत करिता आनंदवन महारोगी सेवा समिती पुढे सरसावली आहे. जिवती तालुक्यातील दुर्गम भागात दोनशे आदिवासी दिव्यांग आणि गरजू कुटुंबांना महिनाभराच्या रेशन किट नुकत्याच तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
वरोरा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट मशीन्स, पाच मोठे ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधे देण्यात आली आहे. यापुढेही रुग्णांना आवश्यकतेनुसार औषधे दिली जाणार असल्याचे आनंदवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ यांनी सांगितले. शांतीवन प्रकल्प बीड येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत असून त्याकरिता आनंदवनातून शंभर खाटा, शंभर गाद्या, चादरी आणि कापडी मास्क पाठविण्यात आले आहेत.
वरोरा तालुक्यातील दिव्यांग ,निराधार आणि भूमिहीन कुटुंबाकरिता ३०० रेशन किट देण्यात येणार असून एकूण एक हजार रेशन किट वितरित करण्याचा संकल्प आनंदवनाने केला आहे. यासोबतच कोरोना बाधितांवर उपचार केले जात असून त्यातून अनेक रुग्ण बरे झाले आहेत. आनंदवनातील शाळा आणि वसतिगृह कोरोना रुग्णांना विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेले असून त्यांच्यावर डॉ. विजय पोळ हे स्वत: उपचार करीत आहेत.
हे सर्व सेवा कार्य महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या मार्गदर्शनात कौस्तुभ आणि पल्लवी आमटे, कपिल कदम, सीतारतन रुग्णालयाची चमू, अतुल मांडवगणे, राजेश ताजने, शौकत खान, रवींद्र नलगटीवार, साबिया खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते या सेवाभावनेतून करीत आहेत.