वेतन आयोगाची थकबाकी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:55+5:302021-02-06T04:50:55+5:30
चंद्रपूर : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मलेरिया ...

वेतन आयोगाची थकबाकी द्यावी
चंद्रपूर : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी कामगार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्षे उशिराने लागू करण्यात आला. दरम्यान, या कालखंडातील थकबाकी कामगारांना अद्याप देण्यात आली नाही, असा आरोप प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केला. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना पूर्वी वर्षातून चार महिने काम मिळत होते. आता ते एक महिन्यावर आले. सरकारच्या धोरणामुळे या वर्षात फवारणीचे कामच सुरू झाले नाही. राज्यातील फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी ४ कोटी ५ लाख ५९ हजार असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवाव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केले आहे. या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या आरोग्यदायी योजनांचा लाभ पोहोचविणे गरजेचे आहे. मात्र, काही आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कापूस उत्पादकांच्या समस्या वाढल्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, यंदा अवेळी पाऊस, बोंडअळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. यातून गरीब शेतकरी बळी पडण्याची शक्यता आहे. यंदा कीडीने कपाशीचे उत्पादन घटले आहे. काही शेतकऱ्यांना खर्च निघणार की नाही, हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चौकशी करून कापूस उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गडचांदूर-जिवती मार्गावरील खड्डे बुजवा
जिवती : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. परंतु, रस्त्यांची दुरवस्था झाली. त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जनावरांना टॅग लावण्याची मागणी
चंद्रपूर : तालुक्यातील बहुतांश नागरिक शेतीवरच उदरनिर्वाह करतात. आता दुधाळू जनावरांचे पालन करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच जनावरांना टॅग लावून नोंदणी करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
शाळांची वीज कटण्याची शक्यता
चंद्रपूर : मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून शाळांना सुटी देण्यात आली. दरम्यान, या शाळांचा उपयोग बाहेरून येणाऱ्या नागरिकांना विलगीकरण करण्यासाठी करण्यात आले. मात्र मार्च महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत शाळांचा मोठ्या प्रमाणात वीज वापर झाल्याने या शाळांचे वीज बिल भरससाठ आले आहे. शाळांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ते बिल भरणे सध्यातरी कठीणच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही शाळांची वीज कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावरील अंधार दूर करा
कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गावर पथदिवे नसल्याने परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरले असते. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वणी मार्गावर पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, तालुका क्रीडासंकुल आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.
भद्रावती तालुक्यात
रानडुकरांचा हैदोस
भद्रावती : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील काही गावातील शिवारात जंगली प्राण्यांनी शेतात धुमाकूळ सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेले पिकांचे प्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वनसडी ते पिपर्डा रस्त्यावर खड्डे
कोरपना : कोरपना तालुक्यातील वनसडी ते पकडीगुड्डम धरणाला जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर पिपर्डा, कारगाव, धनकदेवी, मरकागोंदी, जिवतीला जाण्याचा एकमेव मार्ग आहे. परिणामी रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
वीज वितरण जनित्र बनले धोकादायक
कोरपना : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील अनेक गावात डीपी उघड्या राहतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नवतळा मार्गाची दुरुस्ती करावी
चिमूर : तालुक्यातील पिंपळगाव-नवतळा ही गावे ८ किमी अंतरावर आहेत. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्याची दुरस्ती करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त
सिंदेवाही : नवरगाव-रत्नापूर येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नवरगाव-रत्नापुरातील विद्युत पुरवठा वारंवर खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागते.
रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाºया १० वाहन चालकांवर पोलिसांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. यामध्ये बल्लारपूर पोलिसांनी तीन, ब्रह्मपुरी सहा, तर वरोरा पोलिसांंनी एक वाहनचालकांवर कलम भांदवि २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोसा उत्पादकांना लोखंडी शिडी द्यावी
चंद्रपूर : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा (रेशीम) उत्पादनावर भर आहे. सावली, मूल, चिमूर, सिंदेवाही तालुक्यात कोसा उत्पादन घेतल्या जाते. झाडावरुन कोसा तोडण्यासाठी लोखंडी शिडी शासनाने सदर उत्पादकांना द्यावी, अशी मागणी कोसा उत्पादकांनी केली आहे. चिमूर तालुक्यात मोटेगाव, काजळसर, सिंदेवाही-सावली तालुक्यात पेंढरी व पाथरी भागात भोई-ढिवर समाजाचे गरीब कुटुंब कोसा उत्पादन घेतात.
अवैध वाहतुकीला आळा घालावा
भद्रावती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसातच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण
राजुरा : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण आहेत. रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड आणि मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला. शहरात अनेक नागरिक श्वानांचे पालन करतात. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक लस देणे सक्तीचे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नाली उपसा न झाल्याने डासांचा उच्छाद
मूल : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणाम, डासांचे प्रमाण वाढले असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन नाल्याचा उपसा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नोकरभरती बंदीने बेरोजगार निराश
ब्रह्मपुरी : शासनातील विविध विभागांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरतीवर सरकारने बंदी घातली आहे. ग्रामीण भागात हजारो विद्यार्थी पदवीधर होत आहेत. परंतु, कनिष्ठ पदे भरण्यासंदर्भात शासनाने भूमिका घेतली नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले. युवक-युवतींमध्ये प्रचंड निराशा निर्माण आहे. हाताला काम नसल्याने नाराज आहेत. त्यामुळे भरती प्रकिया राबवावी, अशी मागणी युवकांनी एसडीओकडे निवेदनातून केली आहे.
माणिकगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी
जिवती : तालुक्यातील माणिकगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी परराज्यातील पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. परिसरालगत असलेल्या विष्णू मंदिर, शंकरदेव मंदिर, बुद्ध लेणी, अंमलनाला धरण येथेही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहेत.
भारोसा घाटावर पुलाची निर्मिती करा
नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील भारोसा घाटावरून तीर्थक्षेत्र वढा व जुगादला जाण्यासाठी पुलांची निर्मिती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. या ठिकाणी पुलाची निर्मिती झाल्यास चंद्रपूर, कोरपना, वणी तालुक्यातील गावातील नागरिकांना जाण्या- येण्यासाठी सोयीचे होईल तसेच भाविकांना कार्तिक पौर्णिमा व शिवरात्री उत्सवाला भाग घेण्यासाठी सोयीचे होईल. या पुलाच्या माध्यमातून वेळ व आर्थिक बचत होणार असल्याने पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रवासी निवारा बांधण्याची मागणी
चिमूर : शंकरपूर, ब्रह्मपुरी, कान्पा येथे जाण्यासाठी फाट्यावर यावे लागते. या फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने या परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना रस्त्यात राहून बसची वाट बघावी लागते. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी निवाऱ्याची मागणी होत आहे.
अल्ट्राटेक चौकात गतिरोधक उभारा
गडचांदूर : गडचांदूर शहरातून राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. या मार्गावरून दिवसरात्र वाहतूक सुरू असते. मात्र गतिरोधक नसल्याने येथे अपघात होत आहेत. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक, संविधान चौक व बाबुराव शेडमाके चौकात गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत.
शेतमाल विक्रीसाठी कृउबासमध्ये गर्दी
चंद्रपूर : खरीपातील पीक निघाले आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे पीक ओले होण्याची भीती असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी करणे सुरू केले आहे.
जिवती आरोग्य केंद्राला डाॅक्टर मिळणार
जिवती : येथील आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला होता. आता लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासंदर्भात आम आदमी पार्टीने निवेदन दिले होते. जिवती तालुका अध्यक्ष मारुती पुरी, सचिव गोविंद गोरे, सहसंयोजक सुनील राठोड, बाबू पवार आदी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर देण्याची मागणी केली होती. रुग्णालयात कायस्वरूपी डॉक्टर मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.