पाटणचे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुविधाविनाच
By Admin | Updated: September 4, 2014 23:42 IST2014-09-04T23:42:16+5:302014-09-04T23:42:16+5:30
जिवती तालुक्यातील पाटण या ग्रामपंचायत असलेल्या गावात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता तीेन दिवसांपासून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु झाले आहे. या प्रशिक्षणात सुविधा नसल्याची ओरड

पाटणचे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुविधाविनाच
वनसडी : जिवती तालुक्यातील पाटण या ग्रामपंचायत असलेल्या गावात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता तीेन दिवसांपासून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु झाले आहे. या प्रशिक्षणात सुविधा नसल्याची ओरड विद्यार्थ्यांनी केली असून याठिकाणी सुविधा पुरविण्याची व स्थळ बदलवून देण्याची मागणी प्रशिक्षणार्थ्यांनी केली आहे.
शासनाने अल्पसंख्याक मुलामुलींना पोलीस भरतीत स्थान प्राप्त व्हावे, याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात एक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी व त्याचा फायदा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने माणिकगड पहाडावरील पाटण येथे पहाडावरील एका संस्थेला प्रशिक्षण देण्याचा करार करण्यात आला. त्यासाठी जिल्ह्यातील भद्रावती, गोंडपिंपरी, बल्लारपूर, राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, पोंभुर्णा, नागपूर, कोठारी अशा विविध ठिकाणांवरुन १२८ मुलामुलींंची निवड करण्यात आली. यात आठ मुली व सत्तरच्या आसपास विद्यार्थी येथे दाखल झाले. मात्र येथील व्यवस्था पाहून यातील दहा प्रशिक्षणार्थी दुसऱ्याच दिवशी स्वगावी परत गेल्याची माहिती येथील प्रशिक्षणार्थीनी दिली.
या प्रशिक्षणादरम्यान, मुलांची सोय पाटण येथील एका किरायाच्या खोलीत करण्यात आली तर मुलींची सोय एका शाळेत करण्यात आली आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वा विजेची सोय नाही. वीज नसल्याने पंख्याचीही व्यवस्था नाही. चार सलग खोल्या असून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना झोपण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.
डासांचे प्रमाण अधिक असल्याने विद्यार्थ्यांना रात्रभर डासांचा सामना करत जागत रहावे लागते. अंघोळीची सोय नसल्याने एका नाल्यावर जावून त्यांना आंघोळ करावी लागते. नास्ता पोटभर मिळत नाही. जेवणात तीन दिवसांपासून वांग्याची भाजी मिळत असून जेवणाच्या टिफीनमध्ये मुलांना जेवण दिल्या जाते. भाजी असेल तर वरण नाही वरण असेल तर भाजी नाही अशी जेवण्याची व्यवस्था आहे.
प्रशिक्षणाकरिता सुसज्य मैदानाची आवश्यकता असते. मात्र येथील मैदानावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शिकवायला प्रशिक्षकाची आवश्यकता आहे. परंतु येथे प्रशिक्षकच नाहीत. सकाळी धावाकरीता पाच किमी अंतरापर्यंत घेवून जातात. कोणत्याही प्रकारची प्रशिक्षण साहित्याची सोय नाही. मुली जिथे राहतात, त्या ठिकाणी मुलीच्या संरक्षणाकरिता कोणतीच सुरक्षा नाही. अशा विविध समस्या प्रशिक्षणार्थ्यांनी तात्काळ सोडविण्याची मागणी केली. येत्या दोन दिवसांत या समस्या सुटल्या नाहीत, तर हे प्रशिक्षण आम्ही करणार नाही, असा इशारा प्रशिक्षणार्थ्यांनी दिला आहे.
याबाबतची माहिती मिळताच कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सय्यद आबीद अली यांनी भेट दिली व प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली असता प्रशिक्षणार्थ्यांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याची बाब समोर आली. संस्थेकडे प्रशिक्षण क्षमता नसताना अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करू नये व प्रशिक्षणार्थ्यांचे हाल करून शासनाचीही बदनामी करु नये, असे आबिद अया वेळेस विद्यार्थ्यांना समज घालून याबाबत जिल्हा प्रशासनाला कळवून प्रशिक्षणाची गैरसोय व विद्यार्थ्यांची अवहेलना थांबविण्याकरीता निश्चितच जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देवून सुविधा उपलब्ध करून देतील अशी आशा व्यक्त करून प्रशिक्षण स्थळ बदलवून देण्यात यावे अशी मागणी याप्रसंगी केली. याप्रसंगी पाटण येथील कलिमभाई, फारुकभाई, आरिफभाई, असमा उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)