लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे खासगी वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. दळणवळणाची साधने कमी असल्याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सधारक व अन्य वाहनधारक कोंबून-कोंबून प्रवासी भरत आहेत. एक ते दीड तासाचा प्रवास असेल तर श्वास गुदमरतोय की काय, अशी प्रवाशांची स्थिती होत असल्याचे चित्र दररोजच बघायला मिळत नाही. मागील दीड महिन्यापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न करूनही महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील चारही आगारांतून होणारी प्रवासी वाहतूक बंद आहे. यावर जिल्हा प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी ट्रॅव्हल्स, स्कूलबस, चार चाकी आदी वाहनांद्वारे वाहतुकीस परवानगी दिली आहे. बसफेऱ्याच बंद असल्याने प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सधारक तसेच इतर वाहनधारकसुद्धा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये भरून वाहतूक करीत आहेत. एकदा ट्रॅव्हल्समध्ये बसले किंवा उभे राहिले तर साधे हलायलाही जागा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे .
बसायचे असेल तर बसाबसमध्ये कोंबून-कोंबून प्रवासी भरण्यात येतात. यावेळी एखाद्या प्रवाशाने ट्रॅव्हल्सधारकाला हटकले तर “बसायचे असेल तर बसा; अन्यथा उतरा,” अशी सरसकट धमकीच दिली जाते. परंतु, प्रवाशांजवळ पर्याय नसल्याने त्यांना नाइलाजाने उभे राहून प्रवास करावा लागत आहे.
तिकीट दरामध्येही वाढखासगी वाहनधारकांनी एसटी महामंडळाच्या संपाचा फायदा घेत तिकीटदरामध्ये प्रचंड वाढ केली आहे. पॅसेंजर रेल्वे, एसटी बंद असल्याने प्रवाशांना नाइलाज असल्याने अधिक तिकीट देऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बस सुरू असताना प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी बसपेक्षा कमी तिकीट असायचे. मात्र एसटी बंद असल्याने बसच्या तिकिटापेक्षा अधिक तिकीट आकारण्यात येत आहे.