पावसाने मोडला शेतकऱ्यांचा कणा

By Admin | Updated: August 30, 2014 23:35 IST2014-08-30T23:35:19+5:302014-08-30T23:35:19+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिली. काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळला. मात्र अनेक ठिकणी पावसाने अद्यापही हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलविलेल्या

Particles of Farmers to Break By Rain | पावसाने मोडला शेतकऱ्यांचा कणा

पावसाने मोडला शेतकऱ्यांचा कणा

लखमापूर : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिली. काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळला. मात्र अनेक ठिकणी पावसाने अद्यापही हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलविलेल्या शेतातील पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला. यात अनेक कंपन्याचे महागडे बियाणे, खतांचा वापर करण्यात आला. त्यामुळे आता मोठी आर्थिक चणचण भासत आहे. याचाच परिणाम कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांसाठी अनेकदा नवीन आर्थिक धोरण आणि योजनांचा पाऊस पाडला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. शेतात उभे पीक कधी पुराने तर कधी पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाजारात ‘जे पिकलं ते विकलं’ जात नसल्याने नेहमीच मालाच्या चढ-उतार किमतीच्या कात्रीत शेतकरी सापडत आला आहे. दोन वर्षांपासून हाताशी असलेला पैसा खर्च करून शेतकरी शेती करीत आहे. परंतु त्यांची झोळी नेहमीच रिकामी झालेली दिसत आहे.
जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, धान यासारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यासाठी उत्पादन खर्चही अधिक आहे. मात्र पिकांची विक्री करताना दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन माल विकावा लागतो. बाजारापेठेचा अभावही शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकताना दिसतो. यामध्ये प्रवास खर्च, मजुरी अधिक लागते.
आता गावागावांत इंग्रजी शिक्षणाचे लोण पसरले आहे. त्यामुळे मुलांच्या भविष्याकडे बघून अनेक शेतकरी पालकांनी आपली मुले इंग्रजी शाळेत दाखल केली आहे. परंतु हाताशी दमडी नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक बजेट शेती उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे कौटुंबिक खर्च व इतर खर्च करताना त्याला अनेकदा विचार करावा लागतो. वाढत्या महागाई सोबतच मजुरी, शेती साहित्य व बियाणांचे भाव गगनाला भिडले.
मात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भावाने विकावे लागत असल्याची खंतही शेतकरी व्यक्त करतात. अनेक योजनांचा लाभ घेताना कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतकऱ्यांचे अर्धे पैसे त्यासाठीच खर्च होतात. त्यामुळे शेतकरी योजनांपासून आजही वंचित आहेत. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजही शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास कायम आहे. नवीन तंत्रज्ञान आणि लागवड पद्धती शेतकऱ्यांसाठी वरदान मानली जात असली तरी ‘पाणी आणि पैसा’ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे चक्र बदलत असून अधिक पाऊस आल्याने व पाऊसच न आल्याने शेतकऱ्यांना दोन्ही बाजूने अडचणींचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Particles of Farmers to Break By Rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.