महसूल भवन परिसरातील वाहनतळ वादाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: July 28, 2014 23:28 IST2014-07-28T23:28:42+5:302014-07-28T23:28:42+5:30
शहरामध्ये वाहनतळाची समस्य आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एका कंत्राटदाराच्या माध्यमातून महसूल भवन परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली. हा करार १ आॅगस्ट २०१४ ते १३ जुलै २०१६

महसूल भवन परिसरातील वाहनतळ वादाच्या भोवऱ्यात
चंद्रपूर : शहरामध्ये वाहनतळाची समस्य आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे एका कंत्राटदाराच्या माध्यमातून महसूल भवन परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली. हा करार १ आॅगस्ट २०१४ ते १३ जुलै २०१६ पर्यंतच्या कालावधीसाठी असताना संबंधित कंत्राटदाराने ११ जुलैपासूनच वाहनतळ शुल्क आकारणे सुरु केल्याने महसूल भवन परिसरातील हे वाहनतळ आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या संदर्भात तक्रार केल्यानंतर जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील सर्वात गजबजलेला आणि शासकीय कामकाजाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण भाग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बसस्थानक, जिल्हा सत्र न्यायालय, काही अंतरावर असलेले रेल्वे स्टेशन,पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर शासकीय कार्यालय असल्यामुळे जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची बरीचवर्दळ असते. हा विषय लक्षात घेवून वाहनतळाची समस्या सोडविण्याकरिता महसूल कर्मचारी कल्याण निधी समितीतर्फे या संदर्भातील कंत्राट काढण्यात आले. आणि एका कंपनीला दोन वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले.
१ आॅगस्ट २०१४ पासून १३ जुलै २०१६ पर्यंतचा हा करार असून, कराराची तारीख सुरु होण्यापूर्वीच कंत्राटदाराने पार्किंग शुल्क आकारणे सुरू केले. स्कूटर, मोपेड, आटॉरिक्षा यासाठी आठ तासाकरिता ५ रुपये, तर कार व इतर चारचाकी वाहनासाठी १० रुपये शुल्क आकारण्याचा करार दिनेश इंटरप्रायजेसचे संचालक दिनेश रामविलास मिश्रा यांनी केला. परंतु इतर काही व्यवस्था न करता केवळ शुल्क पावतीवरच निर्धारित दिनांकापूर्वीच वसुली सुरु करण्यात आली. सोबतच या कामावर एका वयस्क महिलेला कंत्राटदाराने नेमले. त्या महिलेच्याअसभ्य वर्तणुकीमुळे एका संघाने या विषयावर चाचपणी सुरु केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. यासंदर्भातील तक्रार करण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करुन ज्या जागेवर कंत्राटदाराने वाहनतळ व्यवस्था सुरू केली जी जागा प्रत्यक्षात वाहनतळासाठी नसल्याचे सांगितले आणि त्याचवेळी महसूल भवनाच्या लगत असणाऱ्या जागेला स्वच्छ करुन तेथे वाहनतळाची व्यवस्था उभारण्याचे आदेश दिले.कंत्राटदाराने या कामावर असलेल्या महिलेला कामावरुन काढल्याची माहिती तहसीलदार व उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यासंदर्भात जितेंद्र डोहणे, दिनेश एकरवार, सुरेश नारनवरे, तथागत पेटकर, सोमेश्वर येलचलवार, संजय कन्नावार, राजेश टेंभुर्णे, संतोष साखरकर यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. परंतु दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर चुनखडीने आखणी करुन पार्किंग लावण्यात आल्यामुळे हा विषय आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (नगर प्रतिनिधी)