राजोली परिसरातील धान रोवणी खोळंबली
By Admin | Updated: August 16, 2014 23:24 IST2014-08-16T23:24:21+5:302014-08-16T23:24:21+5:30
ऐन रोवणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने या परिसरातील धान रोवण्या खोळंबल्या आहेत. शेतशिवारातील जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. दिवसभर कडक उन्ह व रात्री

राजोली परिसरातील धान रोवणी खोळंबली
राजोली : ऐन रोवणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने दडी मारल्याने या परिसरातील धान रोवण्या खोळंबल्या आहेत. शेतशिवारातील जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. दिवसभर कडक उन्ह व रात्री त्रस्त करणारा उष्मा यामुळे नागरिक हैराण आहेत, तर या विचित्र वातावरणामुळे धान पऱ्ह्यावर अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. लवकरच दमदार पाऊस झाला नाही तर फार मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागेल, या विवंचनेत शेतकरी वर्ग चिंताग्रस्त असल्याचे परिसरात चित्र आहे.
उत्तम तांदळाचे कोठार व बाजारपेठ म्हणून या परिसराची ओळख आहे. देशात येथील तांदळाला विशेष मागणी आहे. धान रोवणीच्या हंगामात इतर तालुक्यातील शेकडो मजूर या परिसरातील रोवणीच्या कामासाठी वास्तव्यास असतात. अशावेळी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे मजुरांची उपासमार होण्याची चिन्हे दिसत आहेत. उशिरा पावसाच्या आगमनामुळे काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी चिखल पऱ्हयाद्वारे धानाची रोपे तयार करून रोवणीला सुरवात करण्यात आली. इंजिन व पंपाचा उपयोग करून मिळेल तेथील पाण्याचा उपसा करून रोवण्या साधल्या गेल्या. परंतु आता गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दगा दिल्यामुळे राजोली, डोंगरगाव, गांगलवाडी, चिखली, नवेगाव, ताडकुज, गोलाभूज, मुरमाडी, लोनखैरी आदि शिवारातील धान रोवण्या ठप्प झाल्या आहेत.
जलाशयाची स्थिती अतिशय नाजुक असून अत्यल्प पावसाच्या प्रमाणामुळे नदी, नाले, बोड्यात खडखडाट आहे. जिल्ह्यातील मामा तलावात सर्वात मोठा राजोली मामा तलावात फक्त २६ टक्के जलसाठा आहे तर डोंगरगाव ६८ टक्के, गोलाभूज मामा १० टक्के, तांबेगडी मामा १७ टक्के, सायमारा १० टक्के, चिकमारा १७ टक्के, गोलाभूज ल.पा. २८ टक्के, भसबोरण ल.पा. ४८ टक्के पाणी आहे. आजमितीस पावसाची महत्वाची नक्षत्रे कोरडी गेल्याने पिकाच्या भवितव्याची चिंता भेडसावत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.(वार्ताहर)