अनाथ गतिमंद विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:38+5:302021-02-05T07:42:38+5:30
मागण्या पूर्ण होतपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार : शासनस्तरावर पाठपुरावा करूनही उपयोग नाही चंद्रपूर : लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा ...

अनाथ गतिमंद विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू
मागण्या पूर्ण होतपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार : शासनस्तरावर पाठपुरावा करूनही उपयोग नाही
चंद्रपूर : लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद गतिमंद मुलांच्या शाळेला अनुदान नाही तसेच येथील विद्यार्थी १८ वर्षांच्या वर झाले असतानाही शासनाने त्यांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे संस्थेला अकारण त्यांचे पालनपोषण करावे लागत आहे. दुसरीकडे अनुदान नसल्याने उसनवारीवर खर्च सुरू आहे. त्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांसह संस्था पदाधिकारी, कर्मचारी उपोषणाला बसले असून या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करा, नाही तर अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासननियमानुसार संस्थेमध्ये १८ वर्षांच्या वर गतिमंद विद्यार्थ्यांना ठेवता येत नाही तसेच त्यासाठी शासन कोणतेही अनुदानही देत नाही. १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे लागते. मात्र, या संस्थेत असलेले विद्यार्थी हे काम करण्याच्या स्थितीत नसल्याने आणि १८ वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. यासंदर्भात संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करा नाही तर संस्थेला अनुदान देण्याची मागणी केली आहे. मात्र, शासन तसेच स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी संस्था चालविणे तसेच या मुलांचे पालनपोषण करणे आता कठीण झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह संस्था पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.
स्वतंत्र भारतात गतिमंद विद्यार्थ्यांवर उपोषणाची वेळ आली, ही दुदैवाची बाब असल्याचे मत संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी व्यक्त केले असून जोपर्यंत शासन यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.