मूल विभागात ६०३ दारूविक्री गुन्ह्यांची नोंद
By Admin | Updated: January 23, 2016 01:19 IST2016-01-23T01:19:18+5:302016-01-23T01:19:18+5:30
मूल पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या मूल, सावली, पाथरी, सिंदेवाही व पोंभूर्णा पोलीस स्टेशनमध्ये ....

मूल विभागात ६०३ दारूविक्री गुन्ह्यांची नोंद
पोलिसांची कारवाई : ७३ लाखांची दारू तर ९२ लाखांची वाहने जप्त
मूल : मूल पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या मूल, सावली, पाथरी, सिंदेवाही व पोंभूर्णा पोलीस स्टेशनमध्ये १ एप्रिलपासून जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीत पोलिसांनी धडक मोहीम राबवून ६०३ गुन्ह्यांची नोंद केली आहे. ७३ लाख ३५ हजार ५६८ रुपयांची दारू तर ९२ लाख ७९ हजार रुपयांची वाहने जप्त केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबविली. त्यामुळे दारूबंदी गुन्ह्याचा आलेख वाढत जावून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याचा परिणाम म्हणजे दारू प्राशन करून वाहने चालविण्याचे प्रमाण कमी झाले.
त्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. सन २०१४ मध्ये ४३१ अपघात झाल्याची नोंद होती तर सन २०१५ मध्ये २९७ गुन्ह्याची नोंद झाली आहे. यावरुन ३४ गुन्ह्यांची घट झाली आहे. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी यांनी व्यक्त केला. दारूबंदीनंतर अलिकडे विविध धार्मिक मिरवणुका शांततेत पार पडत असून सर्वत्र शांतता दिसत आहे.
दारूबंदी असताना दारूची विक्री होणार नाही, याबाबत गावातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना वेळोवेळी दूरध्वनीवरुन संपर्क करून माहिती देण्याबाबत कळविले आहे.
तसेच पोलीस उपविभागातून वेळोवेळी पाच पोलीस स्टेशनमधील गावात संपर्क केला जात आहे. गावात शांतता राहील याबाबत पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महामुनी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)