शेतकरी गटातून सेंद्रिय हळद, केळीची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:59+5:302021-01-02T04:23:59+5:30
जिवती : पारंपरिक शेतीतील पिकांना फाटा देण्यासाठी एका प्रकल्पाच्या माध्यमातून पहाडावरील शेतकऱ्यांचा गट तयार करून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा ...

शेतकरी गटातून सेंद्रिय हळद, केळीची लागवड
जिवती : पारंपरिक शेतीतील पिकांना फाटा देण्यासाठी एका प्रकल्पाच्या माध्यमातून पहाडावरील शेतकऱ्यांचा गट तयार करून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये हळद व केळीची लागवड केली असून यातून त्यांना विक्रमी उत्पादन मिळणार आहे.
शेतकरी गटातील जिवती येथील प्रयोगशील शेतकरी नामदेव जुमनाके यांनी दोन एकरांत लागवड केलेल्या हळद व केळीला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिवतीअंतर्गत जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर व प्रफुल भोपळे यांनी गुरुवारी (दि. ३१) भेट दिली. पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन नामदेव जुमनाके यांनी १२ शेतकऱ्यांचा गट करून सेंद्रिय हळद व केळीची लागवड केली. जिवती तालुक्यात गटशेतीचा हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नामदेव जुमनाके दोन एकरांमधून जवळपास १८० क्विंटल हळदीचे उत्पादन घेणार असल्यामुळे ही शाश्वत शेती जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. यावर प्रक्रिया करून स्वतः पावडरची विक्री करणार आहेत. त्यामुळे नक्कीच ही शेती परवडणारी आहे. या नावीन्यपूर्ण शेतीकरिता जिवती येथील मनोज मेश्राम यांनी वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केले व विक्री व्यवस्थापनकरिता भांडारकर यांनी नियोजन करून दिले. या भेटीदरम्यान जिवती, उमेद कार्यालयातील संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.