प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा मार्ग खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:43 IST2018-01-12T23:42:41+5:302018-01-12T23:43:54+5:30
क्षेत्रिय वेकोलि विभागातील भटाळी विस्तारीकरण खदान व दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या दोन्ही खदानीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे अनुक्रमे ९० कोटी व ५२ कोटी रूपये वितरीत करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा मार्ग खुला
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : क्षेत्रिय वेकोलि विभागातील भटाळी विस्तारीकरण खदान व दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या दोन्ही खदानीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ना. अहीर यांच्या प्रयत्नामुळे अनुक्रमे ९० कोटी व ५२ कोटी रूपये वितरीत करण्यात आले. तसेच भटाळी प्रकल्पातील ४१० प्रकल्पग्रस्तांपैकी अनेकांना नोकरी देण्यात आली. विशेषत: दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या प्रकल्पात २७४ नोकऱ्यांना वेकोलि मुख्यालयातून अंतिम मान्यता मिळवून दिली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.
चंद्रपूर वेकोलि क्षेत्रातील भटाळी खदान व दुर्गापूर डीप एक्सटेन्शन हे दोन्ही प्रकल्प ओपनकॉस्ट प्लस असताना ना. अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही प्रकल्पाचा महाजेनकोसोबत करार केला. यावेळी वेकोलि सीएमडी आर. आर. मिश्र यांच्यासोबत मसाळा तुकूम या गावच्या पुनर्वसनासंबंधी प्रश्न उपस्थित करून निकाली काढला. दुर्गापूर डीप एक्सटेन्शन या प्रकल्पासोबतच पूर्वी वेकोलि प्रबंधनाने नवेगांव, सिनाळा, मसाळा (जुना) व मसाळा तुकूम या चारही गावाचे पुनर्वसन मान्य केले होते.
परंतु, काही कालावधीनंतर केवळ तीन गावाचीच पुनर्वसन प्रक्रीया सुरू केली व गावातील घरांचे सर्व्हेक्षण केले. यावेळी मसाळा तुकूमचे पुनर्वसन वेकोलिद्वारे बाजुला सारल्या गेले होते. मागील वर्षभरापासून ना. अहीर यांनी या गावाचा पुनर्वसनामध्ये समावेश व्हावा, म्हणून चंद्रपूर क्षेत्रिय कार्यालय तसेच वेकोलि मुख्यालयात बैठक घेतली.
त्यामुळे ना. अहीर यांच्या प्रयत्नातून वेकोलि प्रबंधनाने मसाळा तुकूम या गावाचे पुनर्वसन उर्वरीत तिन्ही गावासोबतच करू, असा निर्णय घेत प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये त्याचा समावेश केला. त्यामुळे मसाळा तुकूम गावाचा बेसलाईन सर्व्हेचे सर्व्हेक्षण सुरू होणार आहे.
यावेळी एका कार्यक्रमात प्रकल्पग्रस्ताना निधीचे वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच राहुल सराफ, बंडू रायपुरे, सिध्दार्थ रायपुरे, गिरजाबाई दुर्योधन, तसेच प्रकल्पगस्त उपस्थित होते.