महामंडळाच्या संपादरम्यान काम केलेल्यांनाच मिळाला पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST2021-12-09T05:00:00+5:302021-12-09T05:00:35+5:30
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. तसेच कामावर रुजू न होणाऱ्या शंभर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. चारही आगारातील तसेच ९६ जणांचे निलंबन करण्यात आले. तरीसुद्धा बहुतांश कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत.

महामंडळाच्या संपादरम्यान काम केलेल्यांनाच मिळाला पगार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचा पगार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून, केवळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार काढण्यात आला आहे.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. तसेच कामावर रुजू न होणाऱ्या शंभर कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. चारही आगारातील तसेच ९६ जणांचे निलंबन करण्यात आले. तरीसुद्धा बहुतांश कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत. काही कर्मचारी चार ते पाच दिवस, काही दहा-बारा दिवस कर्तव्यावर रुजू झाले आहेत. याच कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार ७ व ८ डिसेंबरला खात्यामध्ये जमा करण्यात आला असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी स्मिता सुतावणे यांनी दिली. मात्र इतर कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाला नसल्याने ओरड सुरु आहे.
११८ कर्मचारी कर्तव्यावर
महामंडळातील चारही आगारात एकूण १३७२ कर्मचारी आहेत. मात्र, बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. बुधवारी प्रत्यक्ष स्थिती ११८ कर्मचारी कर्तव्यावर तर काही सुट्यांवर असे एकूण २०० कर्मचारी कर्तव्यावर आहेत,
अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या
कर्तव्यावर रुजू होण्यासाठी शासनाने पाच हजार रुपयांची वेतनवाढ दिली. मात्र, तरीसुद्धा कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुरू केल्या. पहिल्याच दिवशी प्रशासकीय विभागातील आठ जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही बदल्यांचे सत्र सुरूच आहे.
मंगळवारी धावल्या दोन बस
मागील दीड महिन्यापासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद आहेत. मात्र मंगळवारी वरोरा डेपोतून एक व चंद्रपूर डेपोतून एक अशा दोन बसफेऱ्या धावल्या. यावेळी चालक-वाहकांनी थोडा गोंधळ केला. मात्र, काही वेळानंतर वरोरा ते भद्रावती व चंद्रपूर डेपोतून सुटलेली बस मूलपर्यंत धावली असल्याची माहिती आहे. वरोरा आगारातून धावलेल्या बसने चार हजाराच्या व रुपयांचा तर चंद्रपूर बसस्थानकातून धावलेल्या बसने दीड हजार रुपयांच्या जवळपासच उत्पन्न कमविले असल्याची माहिती आहे.