केवळ ४९ टक्के कुटुंबाचे ‘कल्याण’
By Admin | Updated: December 22, 2016 01:39 IST2016-12-22T01:39:21+5:302016-12-22T01:39:21+5:30
वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाकडून ‘राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम’ राबविला जात आहे.

केवळ ४९ टक्के कुटुंबाचे ‘कल्याण’
आरोग्य विभागाकडून जनजागृती : गतवर्षीच्या तुलनेत अर्धे उद्दिष्ट अपूर्ण
चंद्रपूर : वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाकडून ‘राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम’ राबविला जात आहे. या कार्यक्रमातर्गत दरवर्षी शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्याला उद्दीष्ट दिले जाते. मात्र २०१६-१७ या वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत केवळ ४९.६४ कुटुंबाचेच ‘कल्याण’ झाल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिली आहे.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमातर्गत पाळणा लांबविण्याच्या तात्पुरत्या पध्दती आरोग्य विभागाने सांगितलेल्या आहेत. मात्र आजही अनेक कुटुंबामध्ये कमी अंतरात मुले जन्माला आलेली आढळून येतात. जिल्ह्यात नसबंदी शस्त्रक्रियागृह असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दरमहा टाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे व निश्चीत केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करुन आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत योग्य लाभार्थ्यांना प्रवृत्त केले जाते व त्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर मोबदलाही दिला जातो.
या कार्यक्रमातर्गत २०१६-१७ या वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला ११ हजार ९९८ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ५ हजार ९५६ शस्त्रक्रिया झाल्या असून याची टक्केवारी ४९.६४ एवढी आहे. गतवर्षी जिल्ह्याने शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण केले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात असून यावर्षीचे उद्दीष्टही पूर्ण होईल, असा आशावाद आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
कमी वयात लग्न, मुलगाच हवा असा अट्टाहास, दोन मुलांमधील कमी अंतर इत्यादी बाबींवर खास आरोग्य शिक्षणाद्वारे जनजागृती केली जात आहे. यासाठी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून काम सुरू आहे. राज्य शासनाने ९ मे २००० च्या शासन निर्णयानुसार ‘छोटे कुटुंब’ या संकल्पनेचा स्विकार केलेला असून या कार्यक्रमानुसार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थ्यांला विशेष सवलतीही दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचे उद्दीष्ट लवकरच पूर्ण होईल, अशी आशा जिल्हा आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अशासकीय स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्त्वाची
कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यासाठी स्थानिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात येतो. स्थानिक व स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये स्वेच्छेने सहभागी होऊन लाभार्थ्यांत जनजागृती करतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेअंतर्गत या संस्थांना आर्थिक सहाय्य सहाय्यक अनुदानाच्या स्वरुपात दिले जाते. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत नागरी आरोग्य केंद्र, नागरी कुटुंब कल्याण केंद्र, सहायक परिचारीका प्रसाविका प्रशिक्षण केंद्रात या योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या संस्था महानगरपालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत.