११ केंद्रांवरून ४ हजार १९१ जणांनीच घेतली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:25+5:302021-02-05T07:40:25+5:30

चंद्रपूर : कोराेना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्यात २३ हजार ६६१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली. ११ केंद्रांवरून प्रत्येकी १०० जणांना लस ...

Only 4,191 people from 11 centers received the corona vaccine | ११ केंद्रांवरून ४ हजार १९१ जणांनीच घेतली कोरोना लस

११ केंद्रांवरून ४ हजार १९१ जणांनीच घेतली कोरोना लस

चंद्रपूर : कोराेना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्यात २३ हजार ६६१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली. ११ केंद्रांवरून प्रत्येकी १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट असताना चिमूर, मूल व सिंदेवाही तालुक्यातील लसीकरणात ढिलाई होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. १६ ते २९ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ४ हजार १९१ जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली. विहित कालावधीतच लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश केंद्र व राज्य शासनाचे आहेत. त्यामुळे सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने समुपदेशनासाठी धावपळ सुरू केली आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिल्या दिवशी ११०० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस टोचण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, ३३१ जणांनीच लस घेतली. भद्रावती, चिमूर, दुर्गापूर, मूल व सिंदेवाही केंद्रात नोंदणी होऊनही एकानेसुद्धा लस घेतली नाही. त्यानंतर या पाचही केंद्रांमध्ये १९ ते २५ जानेवारीपर्यंत प्रतिसादच मिळाला नाही. दरम्यान, वरिष्ठांनी दखल घेऊन तातडीने सूचना दिल्या. समुपदेशनातून मानसिकता तयार केली. परिणामी, २७ जानेवारीला फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लस घेतली. आता तेथील संख्या वाढत आहे. चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागांतर्गत यूपीएचसी २ आणि यूपीएचसी ३ या दोन केंद्रांमध्ये १६ जानेवारीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे आराेग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येते.

लसीकरणात महिलांचे प्रमाण सर्वाधिक

पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस टाेचून घेण्यासाठी २३ हजार ६६१ जणांची नोंदणी झाली.

शासकीय १२ हजार ६१९, खासगी ३ हजार ८९९, केंद्रीय सीएचडब्ल्यू ४१२ आणि एफएलडब्ल्यू ६ हजार ७२९ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लस घेण्यात महिलाच पुढे आहेत.

१६ हजार डोसचा दुसरा साठा मंजूर

पहिल्या टप्प्यात केंद्रीय सीएचडब्ल्यू व राज्य सीएचडब्ल्यू अंतर्गत अनुक्रमे ४६० आणि १९ हजार ६९० असा एकूण २० हजार लसींचा डोस जिल्ह्याला मिळाला. २८ जानेवारीपर्यंत १० हजार ४२० लसींचे केंद्रनिहाय वितरण झाले. ९ हजार ५८० लसींचा साठा उपलब्ध आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याला १६ हजार लसींचा डोस मंजूर झाला. येत्या दोन-तीन दिवसांत नागपुरातून डोस उपलब्ध होणार आहेत.

कोट

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग आता वाढू लागला आहे. नोंदणीकृत सर्व फ्रंटलाइन व हेल्थ केअर कर्मचारी सहजपणे लस घेण्यासाठी तयार होत आहेत. गुरुवारी ११ केंद्रांवरून ११०० पैकी ७८० जणांनी (७०. ९१ टक्के) लस घेतली. त्यामुळे लस टोचून घेण्यासाठी घाबरण्याचे काही कारण नाही हे स्पष्ट झाले. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे.

- डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आराेग्य अधिकारी, चंद्रपूर

Web Title: Only 4,191 people from 11 centers received the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.