कोरोनाच्या भीतीने प्रथमच ऑनलाईन उपवर-वधू परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:52+5:302021-01-01T04:19:52+5:30
राजू गेडाम मूल : कोरोनाच्या संकटामुळे सर्व कार्यक्रम ठप्प पडले. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शेकडो लग्नसभारंभावर बंदी घातली होती. त्यामुळे ...

कोरोनाच्या भीतीने प्रथमच ऑनलाईन उपवर-वधू परिचय
राजू गेडाम
मूल : कोरोनाच्या संकटामुळे सर्व कार्यक्रम ठप्प पडले. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शेकडो लग्नसभारंभावर बंदी घातली होती. त्यामुळे अनेक उपवर-वधूच्या पालकांना चिंता सतावत होती. यात आदिवासी समाजात मोडणाऱ्या सर्व जमातीच्या लोकांसाठी ऑनलाईन उपवर-वधू मेळाव्याचे आयोजन करण्याची संकल्पना लक्ष्मण सोयाम या शिक्षकाने साकारली. मूळ वंशज आदिवासी ब्युरोची निर्मिती करून ऑनलाईन वधूचा परिचय देण्याची संधी उपलब्ध करून दिली.
जो समाज मागासलेला आहे, त्याच समाजाने पुढाकार घेऊन कोरोनाच्या काळात वर-वधू पालकांना आपल्या पाल्याच्या परिचयाची संधी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
शहीद बाबूराव शेडमाके बहुउद्देशीय संस्था जानाळाच्या वतीने मूळ वंशज आदिवासी मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून दरवर्षी वर-वधू मेळाव्याचे आयोजन करण्यात येत होते. मात्र कोरोनाच्या धास्तीने ते होऊ शकले नाही. तब्बल १० महिन्यानंतर सर्व पूर्वपदावर येत असल्याने लग्नसमारंभ सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र कोरोनाची भीती आजही कायम आहे. त्यामुळे वधूचा परिचय गर्दीत न होता, आहे त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून व्हावा, यासाठी पेशाने शिक्षक असलेले संचालक मूळ वंशज मॅरेज ब्युरोच्या वतीने आदिवासी उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन मूल येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन शहीद बाबूराव शेडमाके बहुउद्देशीय संस्था जानाळाच्या अध्यक्ष राधाबाई सोयाम यांच्या हस्ते झाले. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष अशोक येरमे यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन परिचय मेळाव्यात वर-वधूचा परिचय पार पडला. या कार्यक्रमासाठी अशोक अलाम, प्रमोद मडावी, अरविंद मेश्राम, बालस्वामी कुमरे, संतोष सिडाम, गुरुदेव कुळमेथे अभिषेक पेंदा, राहुल पेंदाम, धीरज कनाके, प्रमोद देशमुख, वैशाली सोयाम आदीनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
बॉक्स
१२२ युवक-युवतींनी दिला परिचय
यावेळी १२२ युवक-युवतींनी आपापला परिचय करून दिला. यात महाराष्ट्र राज्यासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड येथील आदिवासीबांधव जुळले होते. यापूर्वी १३ वर्ष स्टेजवर परिचय मेळावा आयोजित केला गेला होता. मात्र यावर्षी कोरोनामुळे १४ वे वर्ष ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडले. समाजाची वेबसाईट तयार करण्याचा मानस ब्युरोचे संचालक लक्ष्मण सोयाम यांनी व्यक्त केला आहे.