वृक्षसंवर्धनासाठी एक कोटी वृक्षदूत !

By Admin | Updated: September 30, 2016 01:07 IST2016-09-30T01:07:44+5:302016-09-30T01:07:44+5:30

दोन कोटी वृक्ष लागवडीला पहिल्याच वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला. पुढे ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

One million trees for tree plantation! | वृक्षसंवर्धनासाठी एक कोटी वृक्षदूत !

वृक्षसंवर्धनासाठी एक कोटी वृक्षदूत !

सुधीर मुनगंटीवार : पालकमंत्र्यांच्या हस्ते ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचे उदघाटन
चंद्रपूर : दोन कोटी वृक्ष लागवडीला पहिल्याच वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला. पुढे ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी वनविभागाच्या वतीने वृक्षदुत नेमले जाणार आहे. राज्यात एक कोटी वृक्षदुत नेमले जातील. लवकरच ही योजना कार्यान्वित होणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
येथील मूल रोडवर वनविभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचे उदघाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधीकरणाचे सदस्य सचिव संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जी.पी.गरड, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, उपवनसंरक्षक आर.टी.धाबेकर आदी उपस्थित होते.
मूल रोडवर बांधण्यात आलेल्या या सेंटरमध्ये वन्यप्राण्यांना दुखापत झाल्यास त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जातील. मुख्य उपचार केंद्र ३७०.२५ चौरस मीटरवर आहे. या ठिकाणी ओपीडी, आॅपरेशन थिएटर, डॉक्टर कक्ष, औषधी कक्ष तसेच प्राण्यांच्या उपचाराकरिता दोन खुले पिंजरे उभारण्यात आले आहे. विविध कारणास्तव जखमी झालेल्या प्राण्यांना या सेंटरमुळे तातडीने उपचार मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वनसृष्टीला सकारात्मकपणे पुढे नेण्यासाठी हे सेंटर महत्वाचे पाऊल असल्याचेही ते म्हणाले.
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उत्तम काम करीत आहे. आपण नेहमीच विभागाच्या पाठीशी असून विभागाच्या विविध विकासात्मक कामांना निधी अपुरा पडणार नाही. पहिल्या वर्षी दोन कोटी वृक्ष लागवड झाल्यानंतर ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. यात विभागाचे योगदान महत्वाचे आहे. वृक्ष वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्यात एक कोटी वृक्षदुत नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी योजना आखली जात आहे. या एक कोटी वृक्षदुतांकडून प्रतिज्ञाप्रत भरुन घेतले जातील. हे वृक्षदुत दरवर्षी प्रत्येकी एक वृक्ष याप्रमाणे एक कोटी वृक्षांची लागवड करतील. राज्यात वृक्षमित्र म्हणूनही वृक्षदुत काम करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते डॉ.रविकांत खोब्रागडे, डॉ.संदिप झोनकर, इकोप्रोचे बंडू धोत्रे तसेच सर्पमित्र उमेश झिरे यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीस महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधीकरणाचे सदस्य सचिव संजय ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचे महत्व सांगितले. कार्यक्रमास वन कर्मचारी, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

वृक्षांमुळेच देशात आनंदाचे वातावरण
अलिकडे उत्पन्नाची व्याख्या बदलली आहे. पर कॅपीटल इन्कम ऐवजी पर कॅपीटल हॅपिनेस मोजण्याची वेळ आहे. जगात भुतान सर्वाधिक आनंदी देश असल्याचे निर्देशनास आले आहे. या देशात मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते. या वृक्षांचा देशात आनंदी वातावरण निर्माण करण्यात मोठा वाटा आहे. त्या देशात जाऊन याबाबीचा अभ्यास आपण करणार असल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: One million trees for tree plantation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.