वृद्धाश्रमवासीयांनी केली ताडोबा सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:16 IST2018-02-24T23:16:11+5:302018-02-24T23:16:11+5:30
वाघांचा मुक्त संचार असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सहलीला जाणाऱ्या पर्यटकांना वाघ निश्चित दिसणार अशी अपेक्षा असते. पण, अनेकदा ती पूर्ण होत नाही. निराश होवून परत जावे लागते.

वृद्धाश्रमवासीयांनी केली ताडोबा सफर
वसंत खेडेकर ।
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : वाघांचा मुक्त संचार असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सहलीला जाणाऱ्या पर्यटकांना वाघ निश्चित दिसणार अशी अपेक्षा असते. पण, अनेकदा ती पूर्ण होत नाही. निराश होवून परत जावे लागते. शेवटी, वाघ ठरला जंगलाचा राजा. दर्शन देणे न देणे ही त्याची मर्जी. पण, विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना वाघाचे सहजतेने दर्शन घेण्याची संधी मिळाली. वृद्धाश्रमातील ३५ ज्येष्ठ नागरिकांचा आनंद गगणात मावेनासा झाला. या सहलीचे आयोजन पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांनी केले होते.
ठाणेदार शिरस्कर व त्यांच्या पत्नी मीनाक्षी शिरस्कर ह वृद्धाश्रमातील वृद्धांची आस्थेने विचारपूस करण्याकरिता नेहमी भेट देत असतात. ताडोबा प्रकल्पात जावून वाघ बघायचा आहे, अशी इच्छा वृद्धांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. दरम्यान, दोन बसगाड्यांची व्यवस्था करून ३५ महिला व पुरुषांना ताडोबा भ्रमणाकरिता नेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक मेघा गोखरे, नायक शिपाई लोकेश नायडू, सुभाष सिडाम व पोर्णिमा महेशकर यांनाही सोबत पाठविले. नागरिकांसोबत स्वत:ही ताडोबा प्रवेश द्वारापर्यंत गेले. दोन्ही गाड्या जंगलात भ्रमंतीवर असताना छोटी तारा नावाची वाघीन गाडीपुढे येऊन उभी झाली. ज्येष्ठांनी ही वाघिण अगदी जवळून बघता आले.
ठाणेदाराचा उपक्रम
विसापुरातील मातोश्री वृद्वाश्रम जंगलाला लागून आहे. जंगलात बिबट्याचा वावर असतो. बिटाने आतापर्यंत अनेक जनावरे फस्त केली आहे. मात्र, वृद्धांना हा बिबट अजून दिसला नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ दोन फुट अंतरावरुन बघण्याची संधी मिळाली. ठाणेदार शिरस्कर यांनी यापूर्वी वृद्धांसाठी आनंदवन, सोमनाथ या ठिकाणची सफर घडवून आणली होती. एकाकी जीवन जगणाºया वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.