तीन वर्षात वाहनांची संख्या दुप्पट
By Admin | Updated: April 28, 2015 01:14 IST2015-04-28T01:14:21+5:302015-04-28T01:14:21+5:30
चंद्रपूर जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. औद्योगिक विकासामुळे चंद्रपूरच्या लोकसंख्येतही

तीन वर्षात वाहनांची संख्या दुप्पट
रवी जवळे चंद्रपूर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. औद्योगिक विकासामुळे चंद्रपूरच्या लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. वाहन ही आजच्या काळातील मूलभत गरज झाली आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही भरमसाठ वाढत आहे. मागील तीन वर्षातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे असलेल्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत रस्ते मात्र इंचभरही वाढले नाही. वाहने वाढण्याची गती बघता वाहतूक व्यवस्थेत आता आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. अन्यथा पुढे अपघाताचीही संख्या वाढून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडू शकतो.
चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात औद्योगिक क्रांती झाली. महाऔष्णिक वीज केंद्र, सिमेंट कंपन्या, वेकोलिच्या कोळसा खाणी, पेपर मील, एमईएल प्लांट, पॉवर प्लांट यासाह अनेक छोटेमोठे उद्योग जिल्ह्यात आहेत. या उद्योगांमुळे परप्रांतातील नागरिकही येथे येऊ लागले. हळूहळू ते जिल्ह्यातच स्थायी होऊ लागले. त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याची लोकसंख्या २१ लाखांच्या घरात आहे. एकट्या चंद्रपूरची लोकसंख्या साडे चार लाखांच्या जवळपास आहे. लोकसंख्या वाढल्याने शहरे गजबजली. जागा अपुरी पडू लागल्याने अतिक्रमण होऊ लागले. यावर प्रशासनाला वेळीच नियंत्रण आणता आले नाही. आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अतिक्रमण व गजबजलेल्या लोकवस्त्यांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत.
एकीकडे रस्ते अरुंद होत असताना दुसरीकडे वाहनांची संख्या मात्र लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या उदयास येऊ लागली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार २०१०-११ मध्ये वाहनांची संख्या वाढून २ लाख ८१ हजार ७६४ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यात दुचाकी, चारचाकी वाहन, आॅटोरिक्षा, ट्रक, टॅक्टर आदी वाहनांचा समावेश आहे. पुढेही वाहने वाढण्याची गती कायम राहिली. आता २०१४-१५ मध्ये चार लाख ५ हजार ५३० वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. म्हणजेच तीन वर्षात वाहनांची संख्या जवळजवळ दुपटीने वाढली आहे.
वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी वाहतूक व्यवस्थेत मात्र बदल झालेला नाही. गावखेड्यातील रस्त्यांची अवस्था बिकटच आहे. गावखेडे सोडा, मागील पाच वर्षात शहरी भागातील रस्तेही रुंद झाले नाही. उलट अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत चालले आहे. चंद्रपूरसारख्या शहराचा विचार केला तर या शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारलेली नाही. महानगरपालिका अस्तित्वात आली असली तरी टाऊन प्लॅनिंगनुसार रस्त्याचे बांधकाम अद्याप झालेले नाही. कस्तुरबा आणि महात्मा गांधी हे चंद्रपुरातील प्रमुख रस्ते आहेत. मात्र या रस्त्यांवर दोन मोठी चारचाकी वाहने गेली तरी वाहतुकीची बोंब होते. चंद्रपुरात आॅटोरिक्षा, स्कूलबस, दुचाकी, चारचाकी वाहने भरमसाठ वाढल्याने वाहतुकीची कोंडी शहरातील प्रत्येक रस्त्यांवर झालेली दिसून येते. जिल्ह्याची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पुढेही अविरत वाढतच जाणार आहे. वाहन ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज असल्याने या वाढत्या संख्येवर कोणालाही आवर घातला येणार नाही. वाहतूक व्यवस्थेत आताच आमुलाग्र बदल घडून आला नाही तर पुढे वाहतुकीची समस्या गंभीर होणार, हे निश्चित.
९१ कर्मचाऱ्यांची गरज; प्रत्यक्षात ३७ कर्मचारी
वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या वाहनांवर नजर ठेवणाऱ्या येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. वाहन परवाना देणे, परवाना नुतनीकरण करणे, रद्द करणे, चालक परवाना देणे, अवजड वाहतूक रोखणे, सर्व वाहनांच्या नोंदी ठेवणे यासारखी बरीच कामे या विभागाला करायची असतात. त्यामुळे या कार्यालयात सदैव रेलचेल दिसून येते. मात्र कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कामाची गती मंदावली आहे. या कार्यालायात ९१ कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र शासनाने दखल घेतलेली नाही. या कार्यालयात सध्या ३७ कर्मचारी आहेत. यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, दोन निरीक्षकांसह १३ अधिकारी आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ एकच आहे. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना स्वत:च खूर्चीवरून उठून कर्मचाऱ्यांना कामे सांगावी लागत आहे. कार्यालय परिसरात वाहने उभी असतात. मात्र वॉचमन नाही.
शाळा वाढल्या; तशा स्कूलबसही वाढल्या
अलिकडे कान्व्हेंट संस्कृती फोफावली आहे. इंग्रजी माध्यमाच्या मोठमोठ्या शाळा उघडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी स्कूलबसची व्यवस्था बहुतांश शाळांमध्ये आहे. त्यामुळे शहरी भागात स्कूलबसमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या स्कूल बसेसना शहरातून फिरण्याची मुभा आहे.
बेरोजगारीमुळे प्रवासी वाहने वाढली
शासनाकडे नोकऱ्या नाहीत. बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे काय रोजगार करावा, हे तरुणांना सुचेनासे होत आहे. अशावेळी ट्रॅक्स, सुमोसारखी वाहने घेऊन त्याचा प्रवासी वाहने म्हणून वापर केला जात आहे. परिणामी प्रवासी वाहने गावागावात सुमार झालेली दिसून येत आहेत.