नेत्रदात्यांची संख्या घटली
By Admin | Updated: October 8, 2014 23:22 IST2014-10-08T23:22:55+5:302014-10-08T23:22:55+5:30
अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना

नेत्रदात्यांची संख्या घटली
जनजागृतीची गरज : साडेपाच वर्षांत केवळ १०५ जणांनी केले नेत्रदान
चंद्रपूर: अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना डोळस करण्याच्या आड येत आहे. आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्याने नागरिक नेत्रदान करण्यासाठी घाबरत आहे. एवढेच नाही तर, कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचे नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नसल्याने मागील काही वर्षांमध्ये नेत्रदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. समाज शिक्षित होत असला तरी, नेत्रदानासाठी आजही अंधश्रद्धा असल्याचे एका सर्व्हेक्षणात समोर आले आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान करण्यासाठी एका कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये समुपदेशनाचे काम मागील अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र आजही नेत्रदानाविषयी नागरिकांत भीती आहे. विशेष म्हणजे, एकाद्या कुटुंबातील सदस्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबीयाना मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्यासाठी समुपदेशन केंद्राद्वारे प्रयत्न केले जाते. मात्र अनेकवेळा यासाठी कुटुंबीय तयारच होत नसल्याची बाब समोर आली आहे.
शासनाने नेत्रदानाची संकल्पना समोर आणली तेव्हा एक सामाजिक कार्य म्हणून याकडे बघितले. मात्र या सामाजिक कार्याला नागरिकांनी अक्षरश: पाठ दाखविली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र संकलन केंद्राला २००९-१० आणि २०१०-११ मध्ये प्रत्येक वर्षी ४० जणांचे नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ठ देण्यात आले होते. यात २००९-१० मध्ये केवळ २८ जणांनी नेत्रदान करून अंधाना जग बघण्याची संधी दिली. २०१०-११ मध्ये यात एकाची घट होऊन २७ जणांनी नेत्रदान केले. २०११-१२ मध्ये २६ जणांनी तर २०१२-१३ मध्ये ७१ नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ट असतानाही केवळ २४ जणांनी नेत्रदान केले. २०१३-१४ मध्ये १६ जणांनी नेत्रदान केले आहे. तर चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यामध्ये केवळ ४ जणांनी नेत्रदान केले आहे. नेत्रदान करणाऱ्यांची घटती संख्या लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. एवढेच नाही तर, अनेकांना अंधश्रद्धेने ग्रासले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी जग बघावे असे प्रत्येकांना वाटते. प्रत्यक्षात मात्र नेत्रदान करण्यासाठी आजही पाहिजे तसे नागरिक समोर येत नसल्याने हजारो अंधाना दृष्टीपासून वंचित राहावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)