नियमांना डावलून न.प. स्वीकृत सदस्यत्व
By Admin | Updated: December 7, 2014 22:47 IST2014-12-07T22:47:51+5:302014-12-07T22:47:51+5:30
बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व

नियमांना डावलून न.प. स्वीकृत सदस्यत्व
कोठारी : बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व मिळवल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. राजेश सिंग यांनी बल्लारपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
अॅड. राजेश सिंग यांनी सांगितले, २०११ ला बल्लारपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुक पार पडली. स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी तिघांनी अर्ज दाखल केला. या निवडणुकीसाठी इंजीनियर, एम.बी.बी.एस. डॉक्टर, प्राचार्य, वकील किंवा कोणत्याही रजिस्टर संस्थेचा पदाधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र राजु झोडे यांनी धम्म शासन सोसायटी, बल्लारपूर या संस्थेचा सहसचिव असल्याचे प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष श्रद्धेय भिक्खु सुमनवण्णे स्थवीर यांच्याकडून प्राप्त केले. परंतु, माहिती अधिकाराखाली प्राप्त माहितीवरुन सार्वजनिक विश्वस्थ संस्था नोंदणी कार्यालयाकडून राजु झोडे यांच्याकडे संस्थेचे कोणतेही पद नसल्याचे माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनीही निवडणुकीदरम्यान प्राप्त प्रमाणपत्राची शहानिशा न करता राजु झोडे यांची सदस्यपदी निवड केली. ही बाब शासनाची दिशाभूल करणारी असून गंभीर स्वरूपाची आहे. याबाबत पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे तक्रार १ डिसेंबरला दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ चौकशीचा फार्स पुढे करून कारवाई करण्यास धजावत आहेत. राजु झोडे यांना पोलीस संरक्षण देत असल्याचा आरोप सिंग यांनी यावेळी केला.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल करून सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी अशाच प्रकारची घटना याच नगरपरिषदेत घडली असता ‘त्या’ प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली व सदस्यत्त्व रद्द केले. मात्र, आता कारवाई करण्यास विलंब का केला जात आहे, असेही सिंग म्हणाले.
बल्लारपूर पोलिसांची भूमिका या प्रकरणात संशयास्पद असून केवळ चौकशी करीत असल्याचा देखावा करीत आहेत. राजु झोडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आवश्यक सर्व दस्ताऐवज पोलिसांना सुपूर्द करण्यात आले आहेत. तरीही कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे. पोलीस ठोस भूमिका घेत कारवाई करीत नसल्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे अॅड. सिंग यांनी यावेळी म्हटले.
जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)