आता उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांच्या नजरा
By Admin | Updated: August 3, 2014 23:17 IST2014-08-03T23:17:53+5:302014-08-03T23:17:53+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जागा काँग्रेसच्या वाट्याला आहेत. मात्र यावेळी ब्रह्मपुरीसह बल्लारपूर, चंद्रपूर या जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

आता उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राजकीय पक्षांच्या नजरा
चंद्रपूर: काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जागा काँग्रेसच्या वाट्याला आहेत. मात्र यावेळी ब्रह्मपुरीसह बल्लारपूर, चंद्रपूर या जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. उद्या ४ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यानिमित्त उपमुख्यमंत्री चंद्रपुरात येत आहेत. यावेळी ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. मुंबईत झालेल्या उभयपक्षांच्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली होती. काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी एकही जागा सोडली जाणार नाही, असे अप्रत्यक्ष सांगून खळबळ उडवून दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब्रह्मपुरी मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला यावा, यासाठी इच्छुक आहेत. मागील दोन वर्षांपासून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसने चालविलेल्या तयारीवरून याची प्रचिती येत आहे. नागपुरात प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेसने विभागीय मेळावा आयोजित केला असताना याच दिवशी राकाँ नेते अजित पवार चंद्रपुरात मेळावा घेत आहेत. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागांची मागणी जोरकसपणे केली जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्याच्या या मागणीला अजित पवार कसा प्रतिसाद देतात, याकडे राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेसचेही लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)