आजपासून चंद्रपुरात तूर खरेदी
By Admin | Updated: May 18, 2017 01:25 IST2017-05-18T01:25:52+5:302017-05-18T01:25:52+5:30
जिल्ह्यात नाफेडने वरोरा येथे मंगळवारी तूर खरेदी पुन्हा सुरू केली आहे.

आजपासून चंद्रपुरात तूर खरेदी
नाफेडची खरेदी : केंद्राचा आधारभूत भाव मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात नाफेडने वरोरा येथे मंगळवारी तूर खरेदी पुन्हा सुरू केली आहे. त्यानंतर चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारपासून तूर खरेदी सुरू करण्यात येत आहे. यावेळी शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारच्या हमी भावाने ही खरेदी केली जाणार आहे.
‘लोकमत’ने १७ मे रोजीच्या अंकात ‘चंद्रपुरात तूर खरेदी बंदच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर दिवसभरात तातडीने हालचाली झाल्या. शेवटी नाफेडची तूर खरेदी सुरू करण्याचे आदेश चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आले. यापूर्वी चंद्रपूरमध्ये भारतीय अन्न-धान्य महामंडळाने विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरनेशनच्या माध्यमातून तूर खरेदी केली होती. त्यामध्ये १० हजार १०७ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. त्यानंतर २२ एप्रिलपासून ही खरेदी बंद होती. यावषी चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी ५६ हजार १३८ क्विंटल तूर खरेदी केली आहे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदी सुरू झाली नव्हती. त्यामुळे बाजार समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना पत्र लिहून तूर खरेदी सुरू करण्याची मागणी केली. तर वरोरा येथे मंगळवारपासून नाफेडने पुन्हा तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे. आता चंद्रपूर येथे १८ मे रोजीपासून केंद्र सरकारच्या ५ हजार ५० रुपये हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपला माल मार्केट यार्डावर विक्रीला आणण्याचे आवाहन चंद्रपूर बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी केले आहे.